चित्रा चौक उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात

आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नागरिकांना दिलासा

नागपुरी गेटपर्यंत थेट वाहतुकीचा मार्ग मोकळा होणार

भातकुली मार्गाचे कामही महिनाअखेर पूर्ण होणार

* उड्डाणपुलाच्या लवकरच लोकार्पणाची शक्यता

अमरावती /16 नोव्हेंबर– शहरातील चित्रा चौक ते इतवारा बाजार परिसरातील रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम अखेर पूर्णत्वाच्या दिशेने जात असून, सध्या अंतिम कामे सुरू आहेत. येत्या 2 महिन्यांत हा पूल वाहतुकीसाठी सज्ज होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भातकुली मार्गाचे कामही नोव्हेंबरअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
त्यामुळे वलगाव मार्गावरील वाहनधारकांना नागपुरी गेटपर्यंत जाण्यासाठी मोठा दिलासा मिळणार असून, चित्रा चौकातील वाहतूक कोंडीची समस्याही कमी होण्याची अपेक्षा आहे. सुमारे 8 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या कामासाठी सुरुवातीला 60 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, कोरोना महामारीमुळे काम रखडल्याने खर्च वाढून 80 कोटी रुपयांवर पोहोचल्याची चर्चा आहे. चित्रा चौक ते नागपुरी गेट या मार्गावरील उड्डाणपुलाचे बांधकाम आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. पुलावरील उर्वरित कामे आणि रंगरंगोटीची कामे सुरू आहेत. हा पूल सुरू झाल्यानंतर वलगाव मार्गाने जाणार्‍या वाहनांना थेट नागपुरी गेटच्या पुढे जाता येणार आहे. विशेषतः चारचाकी आणि मोठ्या वाहनधारकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. यामुळे नागरिकांचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, भातकुलीच्या दिशेने जाणार्‍या मार्गाचे कामही याच महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर या भागातील वाहतुकीला अधिक गती मिळणार आहे. यापूर्वी कामातील विलंबामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. डॉ. सुनील देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने सुनावणी घेतली होती. 31 डिसेंबर 2025 पूर्वी काम पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र, मुदतीनंतरही काम पूर्ण न झाल्याने नागरिकांची प्रतीक्षा वाढली. आता लवकरच पुलाचे लोकार्पण होण्याची शक्यता असून, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री अमरावतीत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Back to top button