राजकमल उड्डाणपूलाचे काम वर्षभरात पूर्ण होणार
आ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला विश्वास

महारेलाचे इंजिनिअर यांच्यासोबत प्रत्यक्ष अवलोकन
अहोरात्र सुरु राहणार नवीन पूलाचे बांधकाम
अमरावती /16 नोव्हेंबर – शहराची महत्त्वाची जीवनवाहिनी असलेल्या राजकमल पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाला अखेर वेग आला आहे. येत्या दीड महिन्यात जुना पूल पाडण्याचे काम पूर्ण करून त्यानंतर नव्या पुलाच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. वर्षभरात पूर्वीपेक्षा अधिक रुंद आणि सुविधायुक्त पूल उभारण्याचा दावा आ. सुलभा खोडके यांनी केला. व्यापारी आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी दिवसरात्र काम केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी आ. खोडके यांनी महापालिकेचे अभियंता तसद्दुक हुसेन आणि अन्य अधिकार्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
जवळपास दीड वर्षापासून राजकमल पूल वाहतुकीसाठी बंद आहे. अनेक अडचणी आणि विलंबानंतर अखेर सोमवारी जुन्या पुलाचे पाडकाम सुरू झाले. दुपारी 4.15 वाजता आ. सुलभा खोडके यांनी जयस्तंभ चौकाकडून रेल्वे स्थानकाच्या दिशेने पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांचे पुत्र यश खोडके, महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष अविनाश माडर्णकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. पुलाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी 2 मोठी यंत्रे लावून पाडकाम केले जाणार आहे. दिवसा पाडकाम करून निघालेला मलबा रात्री नेहरू मैदान आणि सायन्सकोर मैदान परिसरात हलविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद कार्यालयाकडून परवानगी घेतली जात आहे. नव्या पुलाखाली वाहनतळासाठी पुरेशी जागा ठेवली जाणार असून, पुलावरून पूर्वीच्या तुलनेत दुप्पट वाहनांची ये-जा होऊ शकेल. जुन्या पुलातील दगड आणि मलब्याचा नव्या बांधकामात वापर केला जाणार नाही. पुलाची रुंदीही कमी होणार नसल्याचे खोडके यांनी सांगितले. व्यापार्यांचे व्यवहार आणि नागरिकांची ये-जा लक्षात घेऊन कामाचे नियोजन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाहणीवेळी गुरूजी धर्माळे, प्रमोद महल्ले, चंदू खेडकर, मनीष बजाज, प्रशांत डवरे, मंगेश मनोहरे, किशोर देशमुख, कर्नल सिंह राहुल, ऋतुराज देशमुख, हिमांशू गुप्ता, रोशन साहू, नीलेश शर्मा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.





