ऑटोरिक्षा उलटून 10 जण जखमी

महिलेसह तिघांना गंभीर दुखापत

-दर्यापूर-अंजनगाव मार्गावर अपघात
दर्यापूर / 2 जुलै: भरधाव वेगात असलेल्या ऑटोरिक्षावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटोरिक्षा उलटला आणि दहा प्रवाशांना गंभीर दुखापत होवून ते जखमी झालेत. आज बुधवारी, दुपारी 1 वाजताच्या सुमारास दर्यापूर-अंजनगाव सुर्जी मार्गावर तामसवाडी वळनावर हा अपघात घडला. जखमींपैकी एका महिलेसह तीन प्रवाशांना गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्याने त्यांना दर्यापूर येथे प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार या ऑटोरिक्षातून प्रवास करित असलेले सर्वजण गोंडवाघोली गावातील रहिवासी आहेत. शाळेच्या कामानिमित्त ते दर्यापूर येथे येत होते. तामसवाडी गावानजीकच्या वळनावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटोरिक्षा उलटला. या अपघातात चालकासह दहा प्रवासी जखमी झालेत. या मार्गाने जात असलेले काही अन्य वाहनचालक आणि घटनास्थळी हजर असलेले लोक मदतीसाठी धावले. सर्व जखमींना ऑटोरिक्षातून बाहेर काढून तात्काळी दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. डॉ. पंकज कोरडे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी तातडीने जखमींवर उपचार केले. जखमींपैकी तिघांना झालेली दुखापत गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी अमरावतीला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button