खासगी बसचालकांकडून दिवाळीत प्रवाशांची लूट
एसटी भाड्यापेक्षा 50 टक्के अधिक आकारणीची मुभा, 349 बसची तपासणी 6.63 लाखांची वसुली

अमरावती/ 12 नोव्हेंबर – दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावाकडे जाणार्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन शासनाने खाजगी प्रवासी बसचालकांना एसटीच्या ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा जास्तीत जास्त 50 टक्के अधिक भाडे आकारण्याची परवानगी दिली आहे. मात्र, या सवलतीचा गैरफायदा घेत काही बसचालकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अमरावती-पुणे मार्गावर एसटीचे भाडे सुमारे 1,500 रुपये असताना काही खाजगी बसचालकांकडून तब्बल 3,500 ते 4,000 रुपये आकारले जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाने 27 ऑक्टोबर 2026 पासून तपासणी मोहीम सुरू केली असून, आतापर्यंत 349 बसची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 99 बसमध्ये विविध त्रुटी आढळल्या, तर 48 प्रकरणांत नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारल्याची 5 प्रकरणे उघडकीस आली असून, या कारवाईतून एकूण 6 लाख 63 हजार रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. 6 नोव्हेंबरपासून दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गावाकडे जाणार्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अमरावतीहून पुणे, मुंबई आणि नागपूरकडे जाणार्या बसमध्ये गर्दी होत असून, रेल्वेचे आरक्षण न मिळाल्याने नोकरदार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खाजगी बसचा आधार घ्यावा लागत आहे. याच संधीचा फायदा घेत काही बसचालकांकडून मनमानी भाडे आकारले जात आहे. विशेष म्हणजे, अमरावती-पुणे मार्गावर एसटीचे भाडे सुमारे 1,500 रुपये असताना 50 टक्के अधिक आकारणीची परवानगी म्हणजे 2,250 रुपयांपर्यंतच भाडे घेता येते. असे असतानाही काही प्रवाशांकडून 4,000 रुपयांपर्यंत पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, अशा प्रकारांविरोधात फारच कमी प्रवासी तक्रार करतात. त्यामुळे मनमानी भाडे आकारणार्या चालकांवर कारवाई करताना अडचणी येत आहेत. राज्य परिवहन आयुक्त कार्यालयाने खाजगी प्रवासी बसच्या भाडे आकारणीबाबत विशेष सूचना जारी केल्या असून, नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्याचे निर्देश प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत. प्रवासादरम्यान जादा भाडे आकारल्यास किंवा अन्य प्रकारचा त्रास झाल्यास प्रवाशांनी अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ई-मेल पत्त्यावर आरटीओ.27-महाजीओव्ही.इन येथे तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.





