जबरी चोरी प्रकरणातील आरोजी गजाआड
बसस्थानक मार्गावर दलालाला लुटले होते

अमरावती / 2 जुलै: अकोला येथील एका धान्याचा दलाल असलेल्या व्यक्तीला दुचाकीवर लिफ्ट देवून नंतर त्याच्याजवळची 17 हजार रुपयांची रक्कम हिसकून पळ काढणार्या आरोपीला शहर कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. आबिद खान आदिल खान (35, रा. नालसाबपुरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यातील त्याच्या साथीदाराला घटनेच्यावेळी नागरिकांनीच पकडून पोलिसांच्या हवाली केले होते.
अकोला येथे सावतराम बगिचा परिसरातील रहिवासी पंकज कमलकिशोर अग्रवाल (42) हे धान्याचे दलाल आहेत. अमरावती येथे नवल जैन नामक व्यावसायिकाकडे ते काही व्यवहारानिमित्ताने अमरावतीत आले होते. यावेळी त्यांच्याकडे 17 हजार रुपये रोख होते. काम न झाल्याने पंकज अग्रवाल अकोला येथे परतण्यासाठी बसस्थानकावरुन अमरावती रेल्वे स्थानकाकडे पायदळ निघाले होते. तेव्हा दोन युवक दुचाकीने त्यांच्याजवळ आले. आपणही रेल्वे स्थानकावर जात असल्याचे सांगून त्यांनी अग्रवाल यांना दुचाकीवर लिफ्ट दिली. अग्रवाल मध्ये बसले.
दरम्यान रेल्वे स्थानकाकडे न जाता त्यांनी आपली दुचाकी एका बोळात वळविली. तेथे मागे बसलेल्या युवकाने अग्रवाल यांचे तोंड दाबले आणि खिशातील 17 हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. यावेळी पंकज अग्रवाल यांनी आरडाओरड केल्याने लोक गोळा झाले. दुचाकी चालक युवक रोकड घेउन पसार झाला पण त्याच्या साथीदाराला पकडून लोकांनी पोलिसांच्या हवाली केले. पळून गेलेल्या युवकाचा फोटो पंकज अग्रवाल यांनी आपल्या मोबाईलमध्ये काढला होता. त्याच्या दुचाकीचा क्रमांक एमएच 27 / सीएस 5769 अग्रवाल यांनी लिहून घेतला होता.
अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर कोतवालीचे उपनिरिक्षक गिते यांनी तपास सुरु केला. पळून गेलेल्या आरोपीचे नाव आबिद खान आदिल खान असून तो नालसाबपुर्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीचे 17 हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा 87 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई उपनिरिक्षक गिते, रंगराज जाधव, हेकॉ हरीश बुंदेले, प्रमोद हरणे, आकाश इंगोले, आनंद यादव यांनी केली.




