मुदतवाढीनंतरही आकारले पूर्ण तिकीट

एसटीच्या महिला सवलतीबाबत वाहकच अनभिज्ञ

तक्रारीनंतर वरिष्ठांशी संवाद, अर्धे पैसे परत

नागपूर /11 नोव्हेंबर : एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणार्‍या महिला प्रवाशांना तिकिटात 50 टक्के सवलत दिली जाते. मात्र, या सवलतीसाठी राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड (एनसीएमसी) नोंदणी अनिवार्य करण्याच्या निर्णयाला शासनाने 31 डिसेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिली असतानाही एसटीच्या वाहकांनाच या निर्णयाची माहिती नसल्याचा प्रकार समोर आला आहे. परिणामी, महिला प्रवाशांकडून सवलतीऐवजी पूर्ण तिकीट दर आकारला जात असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. नागपूर ते माहूर जाणार्‍या एसटी बसमध्ये हा प्रकार उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 14 एमएच 9327 क्रमांकाच्या नागपूर ते माहूर बसमधून मोनाली आशिष पाठराबे या महिला प्रवासी प्रवास करीत होत्या. त्यांना नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी वाहकाने सुरुवातीला 150 रुपयांचे पूर्ण तिकीट दिले. महिला प्रवाशांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत असताना पूर्ण तिकीट का आकारले जात आहे. अशी विचारणा त्यांनी वाहकाकडे केली. यावर वाहकाने एनसीएमसी सूचना मिळाल्या नसल्याचे सांगितले.

Back to top button