नागपुरात सावत्र वडिलांकडून चिमुकलीवर वारंवार अत्याचार
टीव्हीच्या मागे लावलेल्या कॅमेर्यामुळे संतापजनक प्रकार उघड

आरोपी सावत्र वडिलांना अटक; तीन दिवसांची पोलीस कोठडी
नागपूर/11 नोव्हेंबर -बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी संतापजनक आणि सुन्न करणारी घटना नागपूर शहरात उघडकीस आली आहे. अवघ्या दहा वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर तिच्याच सावत्र बापाने वारंवार अत्याचार केल्याचा अत्यंत गंभीर प्रकार पाचपावली परिसरात समोर आला आहे.
संशय आल्याने आईने घरातील टीव्हीच्या मागे गुप्त कॅमेरा लावला होता. या कॅमेर्यात सावत्र बापाचे काळेकृत्य कैद झाल्याने पोलिसांत धाव घेण्यात आली. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी आरोपी सावत्र बापाला तात्काळ बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नागपूरमधील पाचपावली भागात पीडित चिमुकली तिच्या आई आणि आरोपी सावत्र बापासोबत राहत होती. गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या शरीरावर संशयास्पद खुणा दिसू लागल्याने आईचे मन अस्वस्थ झाले होते. मुलीच्या वर्तनातही बदल जाणवत असल्याने घरातील घडामोडींवर नजर ठेवण्याचा निर्णय आईने घेतला. पतीला शंका येऊ नये म्हणून अत्यंत सावधगिरी बाळगत टीव्हीच्या मागच्या बाजूला गुपचूप कॅमेरा बसवला.
कॅमेर्याचे थेट चित्रीकरण स्वतःच्या भ्रमणध्वनीवर न घेता विश्वासातील मैत्रिणीच्या भ्रमणध्वनीवर जोडण्यात आले होते. या चित्रीकरणात सावत्र बापाचा संतापजनक पराक्रम स्पष्ट दिसला. चिमुकलीला जीवे मारण्याची धमकी देऊन हा अत्याचार सुरू होता. आईने तात्काळ पाचपावली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी 45 वर्षीय आरोपीवर बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) आणि इतर गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
आईची सतर्कता ठरली महत्त्वाची
मुलीच्या शरीरावरील खुणा पाहून आईने धीर न सोडता शिताफीने टीव्हीमागे गुप्त कॅमेरा बसवला. या कॅमेर्यातील चित्रीकरणामुळेच सावत्र बापाचे अमानुष कृत्य समोर आले आणि नराधम बापाला बेड्या ठोकणे शक्य झाले.





