वर्षभरात एसटीच्या 30 बस भंगारात
13 बस भंगारात; मार्च 2027 पर्यंत आणखी 17 बाद, 80 नव्या बसची मागणी; अमरावतीला 40 मिळाल्या

अमरावती/11 नोव्हेंबर- एसटी महामंडळाच्या अमरावती विभागातील जुन्या बस भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याने प्रवासी वाहतुकीवर ताण वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल ते ऑक्टोबर 2026 या काळात 13 बस भंगारात काढण्यात आल्या असून, मार्च 2027 पर्यंत आणखी 17 बस सेवेतून बाद होणार आहेत. त्यामुळे वर्षभरात एकूण 30 बस ताफ्यातून कमी होतील. ही तूट भरून काढण्यासाठी विभागाने 80 नव्या बसची मागणी केली असून, त्यापैकी 40 बस मिळाल्या आहेत.
अमरावती विभागाकडे सध्या एकूण 399 बस आहेत. त्यापैकी सुमारे 350 बस दररोज प्रवासी सेवेत धावतात. उर्वरित बस दुरुस्ती आणि तांत्रिक कारणांमुळे सेवेत उपलब्ध नसतात. आता आणखी 30 बस कमी होणार असल्याने उपलब्ध गाड्यांवरील भार वाढण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात नियमित बससेवा देताना एसटी प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः मेळघाटातील दुर्गम गावांपर्यंत बस पोहोचविणे मोठे आव्हान आहे. शाळकरी विद्यार्थी, कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक आणि रोजच्या प्रवाशांना वेळेवर बस उपलब्ध होण्यासाठी नव्या गाड्यांची गरज आहे. उर्वरित 40 बस लवकर मिळाल्यास ग्रामीण मार्गावरील फेर्या वाढविणे शक्य होईल. दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्याच्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार नव्या बस दाखल करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुन्या बसच्या जागी नव्या बस आणल्या जाणार आहेत. एसटी महामंडळाचे यांत्रिक अभियंता नरसिंग चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2027 पर्यंत अमरावती विभागातील आणखी 17 बस भंगारात काढल्या जातील. त्यामुळे नव्या बस वेळेत मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मेळघाटातील प्रवाशांची चिंता वाढली
मेळघाटातील दुर्गम गावांमध्ये नियमित बससेवा मिळणे आधीच आव्हानात्मक आहे. जुन्या बस कमी झाल्यानंतर नव्या गाड्या वेळेत मिळाल्या नाहीत, तर विद्यार्थी आणि रोजच्या प्रवाशांची गैरसोय वाढू शकते. त्यामुळे ग्रामीण भागासाठी नव्या बसचे नियोजन करून नियमित फेर्या सुरू ठेवणे आवश्यक आहे.





