‘अमुल’चे दूध लिटरमागे 2 ते 4 रुपयांनी महागले
सर्वसामान्यांना महागाईचा दणका

मुंबई/11 नोव्हेंबर : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. ‘मदर डेअरी’ने दूधाचे दर वाढवल्यानंतर आता ‘अमुल’नेही देशभरात ताज्या पाऊच दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 ते 4 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ गुरुवार, 12 नोव्हेंबरपासून लागू होणार असून, यामुळे दुधाच्या किमती 4 ते 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
‘अमुल’ ब्रँडअंतर्गत दुधाची विक्री करणार्या ‘गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन’ने दिलेल्या माहितीनुसार, चारा, जनावरांचे खाद्य, पॅकेजिंग साहित्य आणि इंधनाच्या दरात सातत्याने वाढ झाल्याने उत्पादन व प्रक्रिया खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या वाढत्या खर्चामुळेच दरवाढ करणे भाग पडल्याचे फेडरेशनने स्पष्ट केले आहे. या दरवाढीमुळे मिळणार्या अतिरिक्त महसुलाचा मोठा वाटा थेट दूध उत्पादक शेतकर्यांना मिळणार असून, त्यांना योग्य मोबदला मिळण्यास मदत होईल, असेही फेडरेशनने नमूद केले.





