राज्यातील आदिवासींना मालकीचे प्रॉपर्टी कार्ड देणार

बिरसा मुंडा जयंती सप्ताहानिमित्त उपक्रम

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

नागपूर/11 नोव्हेंबर : भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त 11 ते 18 नोव्हेंबरदरम्यान देशभरात ‘जनजाती गौरव दिवस’ आणि ‘जनजाती गौरव सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाला स्वयंपूर्ण आणि सक्षम बनविण्याची प्रेरणा मिळेल. राज्यातील आदिवासी बांधवांना 15 डिसेंबरपर्यंत त्यांच्या जमिनीचे मालकी हक्क दर्शविणारे प्रॉपर्टी कार्ड देण्याचा सरकारचा निर्णय असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. बुधवारी, 11 नोव्हेंबर रोजी नागपूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
गडचिरोली येथे 15 नोव्हेंबर रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होणार असून राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार आणि आदिवासी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. आदिवासी समाजाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.वनजमिनीवर अनेक वर्षांपासून शेती करणार्‍या आदिवासी बांधवांना मालकी हक्काचे प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. पालघरमध्ये सातबारा देण्याचप्रक्रिया सुरू झाली असून, 15 डिसेंबरपर्यंत राज्यातील आदिवासींना मालकी हक्काची कागदपत्रे देण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच 1 जानेवारी 2011 पूर्वीपासून घर बांधून राहणार्‍या आदिवासी बांधवांनाही घरे देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोनिया गांधींच्या आत्मचरित्र्यावरून काँग्रेसवर टीका
काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ’जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाच्या माध्यमातून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टीकेला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सोनिया गांधी या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष राहिल्या असल्याने त्या भाजपविषयी चांगले लिहिणार नाहीत, हे स्वाभाविक आहे. मात्र, या पुस्तकाच्या माध्यमातून समाजात संभ्रम निर्माण करून मतं मिळविण्याचा हा प्रयत्न करत आहे. आणीबाणीच्या काळातील इंदिरा गांधी यांच्या निर्णयांचाही बावनकुळे यांनी उल्लेख केला.

Back to top button