इर्विन चौकात भीषण अपघात, सुदैवाने सर्व प्रवाशी बचावले

दुचाकीला वाचवतांना ऑटो रिक्षा पलटी

चौकातील वाहनधारक धावले मदतीला

अमरावती/7 नोव्हेंबर – दिवाळीच्या खरेदीसाठी शहरातील बाजार पेठांमध्ये मोठी गर्दी असतानाच शनिवारी (7 नोव्हेंबर) दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास इर्विन चौकात भीषण अपघात घडला. विद्युत दुचाकीवरील 2 महिलांना वाचवण्याच्या
प्रयत्नात भरधाव प्रवासी रिक्षा उलटली. या रिक्षामध्ये 4 ते 5 महिला प्रवाशांसह काही महिन्यांची चिमुकली बालिका होती. रिक्षा उलटल्याने सर्व प्रवासी खाली दबले गेले. मात्र, चौकात उभ्या असलेल्या वाहनचालकांनी आणि वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखत तातडीने मदत केली. रिक्षा उचलून सर्वांना बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.दिवाळीमुळे शहरातील बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी होती. राजकमल चौकातील रेल्वे उड्डाणपूल बंद असल्याने शहरातील बहुतांश वाहतूक इर्विन चौकातून वळविण्यात आली आहे. त्यामुळे या चौकात वाहनांची मोठी वर्दळ होती. शनिवारी दुपारी सांस्कृतिक भवनाकडून खापर्डे बगिच्याच्या दिशेने क्रमांक एमएच 27 बीडब्ल्यू 8435 असलेली प्रवासी रिक्षा महिला प्रवाशांना घेऊन जात होती. त्याचवेळी छावणीच्या दिशेने आलेली विद्युत दुचाकी रिक्षाच्या आडवी आली. दुचाकीवरील दोन्ही महिलांना वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटले आणि रिक्षा दुचाकीवर उलटली. अपघात होताच चौकातील वाहनचालकांनी आपली वाहने रस्त्यावरच थांबवून मदतीसाठी धाव घेतली. वाहतूक पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने उलटलेली रिक्षा उचलून त्याखाली दबलेल्या महिला प्रवासी आणि चिमुकलीला बाहेर काढण्यात आले. विद्युत दुचाकीवरील दोन्ही महिलांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. अपघातामुळे काही काळ चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, वाहतूक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक पूर्ववत केली. मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Back to top button