सेवानिवृत्त कर्मचार्‍याला 45.90 लाखांचा गंडा

आरोपीविरुध्द राजापेेठ ठाण्यात गुन्हा दाखल

अमरावती7 नोव्हेंबर – अमरावतीत ओळखीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास एका निवृत्त बँक कर्मचार्‍याला चांगलाच महागात पडला आहे. ऑनलाइन लेखापरीक्षण आणि प्राप्तिकराशी संबंधित कामात मदत करण्याच्या बहाण्याने आरोपीने वृद्ध दाम्पत्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आधारकार्ड आणि पॅनकार्डची माहिती मिळवून त्यांच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या वेळी तब्बल 45 लाख 90 हजार 77 रुपये परस्पर दुसर्‍या खात्यांत वळते केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, रक्कम परत करण्याचे लेखी आश्वासन देऊनही आरोपीने पैसे परत केले नाहीत. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्धाने राजापेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रवींद्र पळसोडकर (24) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शेजारी राहणार्‍या ओळखीच्या तरुणानेच आयुष्यभराची कमाई लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार राम प्रल्हादराव वाजपे (74) हे बँकेतून निवृत्त झाले असून त्यांची पत्नीही निवृत्तिवेतनधारक आहे. या दाम्पत्याचे बँक खाते बँक ऑफ महाराष्ट्रच्या जवाहर रोड शाखेत आहे. एकनाथ विहार, शंकर नगर परिसरात राहणार्‍या या दाम्पत्याच्या शेजारी मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील रवींद्र पलसोडकर हा आपल्या आईसोबत भाड्याने राहत होता. सन 2018 पासून दोघांची ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेत आरोपीने हळूहळू वृद्धाचा विश्वास जिंकला. आरोपी ऑनलाइन लेखापरीक्षण आणि प्राप्तिकराची कामे करीत असल्याचे सांगून राम वाजपे यांच्या कामात मदत करायचा. त्यामुळे त्यांचाही त्याच्यावर विश्वास बसला. याच काळात ऑनलाइन कामाच्या नावाखाली त्याने आधारकार्ड आणि पॅनकार्डची माहिती मिळवली. त्यानंतर वृद्धाच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या वेळी मोठ्या रकमा इतर खात्यांत वळत्या केल्या. सुरुवातीला खात्यातील व्यवहारांची माहिती नसल्याने वृद्धाच्या लक्षात हा प्रकार आला नाही. काही काळानंतर खात्यातील जमा रक्कम कमी होत असल्याचे दिसल्याने त्यांनी चौकशी सुरू केली. त्यातून 45 लाख 90 हजार 77 रुपये काढल्याचे समोर आले. आरोपीने पैसे घेतल्याचे मान्य करून लेखी आश्वासनही दिले; मात्र ठरलेल्या मुदतीत एकही रुपया परत केला नाही. अखेर राम वाजपे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. राजापेठ पोलिसांनी गुन्हा नोंदवून बँक व्यवहार आणि रक्कम वळती केलेल्या खात्यांची तपासणी सुरू केली आहे.

Back to top button