तहसीलदार विजय लोखंडे निलंबित

महसूल विभागाची मोठी कारवाई

गंभीर अनियमितते प्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश

अमरावती/7 नोव्हेंबर – अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन भूखंडांच्या विभाजनाचे आणि एकत्रीकरणाचे आदेश काढणे, वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे, सातबारा उतार्‍यांमध्ये नियमबाह्य बदल करण्याचे आदेश देणे तसेच ऑनलाइन फेरफार प्रक्रियेला बगल देत मनमानी निर्णय घेणे, अशा गंभीर अनियमिततांचे आरोप झाल्याने अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांना राज्याच्या महसूल विभागाने तातडीने निलंबित केले आहे. शुक्रवार, 6 नोव्हेंबर रोजी याबाबत अधिकृत आदेश काढण्यात आला. या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याचे निर्देशही शासनाने दिल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. शासनाच्या निलंबन आदेशानुसार, विजय लोखंडे यांनी आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन भूखंडांच्या विभाजन आणि एकत्रीकरणासंबंधी निर्णय घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच ठरवून दिलेल्या प्रशासकीय आणि आर्थिक अधिकारांच्या मर्यादेचे उल्लंघन करून मोठ्या क्षेत्रफळाच्या अकृषक जमिनींबाबतही स्वतःहून आदेश काढल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित जमिनींचे नकाशे, अकृषक परवानगी आणि नियोजन प्राधिकरणाची मंजुरी यांची योग्य तपासणी न करताच निर्णय घेतल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 155 चा वापर केवळ लेखनिक किंवा संगणकीय चुका दुरुस्त करण्यासाठी करता येतो. मात्र, या तरतुदीचा गैरवापर करून अधिकार अभिलेखात नवीन सातबारा उतारे तयार करण्याचे आदेश दिल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. ही बाब नियमबाह्य असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. जमाबंदी आयुक्तांच्या निर्देशानुसार ऑनलाइन ई-फेरफार प्रणालीचा वापर बंधनकारक असतानाही ऑफलाइन अर्ज स्वीकारल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. मूळ खातेदारांना कायदेशीर नोटीस न देणे, सुनावणीची संधी न देता एकतर्फी निर्णय घेणे आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन न करणे, अशा बाबीही समोर आल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील नियम 3 चे उल्लंघन केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सर्व बाबी गंभीर मानून विजय लोखंडे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे निश्चित करण्यात आले असून, पुढील विभागीय चौकशीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Back to top button