कारच्या काचा फोडून प्राध्यापकाची 1.20 लाखांची रोकड लंपास

टोम्पे महाविद्यालयाच्या आवारातील घटना

*चांदुर बाजारात चोर्‍यांचे सत्र सुरुच

चांदुर बाजार/ 1 जुलै : चांदुर बाजार शहर व परीसरात गेल्या काही दिवसांत घरफोडी, पाकीट मारी, चोरीच्या घटनेत मोठ्य प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात 8 लाखाची घरफोडी झाली तर गेल्या आठवड्यात एसटी बस स्थानकावरुन महिलेचे सहा लाखाचे दागीने लंपास करण्यात आले. या घटना ताज्या असतानाच आज मंगळवारी दुपारी 1 ते 2 वाजताच्या दरम्यान अमरावती मार्गावरील गो. सी. टोम्पे महाविद्यालयाच्या आवारात प्राध्यापकाच्या उभ्या असलेल्या आणि लॉक केलेल्या चार चाकी वाहनाची काच फोडुन त्यातील 1 लाख 20 हजाराची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. टोम्पे महाविद्यालयातील प्रा. जयंत बनसोड यांनी बँक आँफ महाराष्ट्रमधून 1 लाख 20 हजार रुपयांची रोकड आज दुपारी काढली होती. ही रक्कम त्यांनी महाविद्यालयातील अन्य प्राध्यापक रविंद्र डाखोरे यांच्या मालकीच्या एमएच 27 / एआर 3123 क्रमांकाच्या कारमध्ये ठेवली. कार लॉक करुन महाविद्यालय परिसरात असलेल्या प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज वाचनालयासमोर उभी करण्यात आली होती. दरम्यान 1 ते 2 वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने या वाहनाची चालकाच्या बाजूची खिडकीची काच फोडली आणि कारमधील 1.20 लाख रुपयांची रोकड लंपास केली. दोन्ही प्राध्यापक काम आटोपून कारजवळ आले असता चोरीची ही घटना उघडकीस आली. घटनेची तक्रार प्रा. जयंत बनसोड यांनी चांदूर बाजार पोलीस स्टेशन येथे केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. गेल्या सहा महिन्यात चांदूरबाजार पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या चोरी, घरफोडी व अन्य गुन्ह्यांपैकी एकाही प्रकरणाचा छडा लावण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे की काय चोरट्यांचे मनोबल वाढले असून शहर व परिसरात चोरीचे सत्र सुरुच असल्याचे आजच्या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button