केबल व मोटर पंप चोरणार्या टोळीतील दोघे जेरबंद
1.53 लाखांचा मुद्देमाल जप्त

*मोर्शी पोलिसांची कारवाई
मोर्शी / 1 जुलै: मोर्शी आणि अन्य तालुक्यात व शेजारच्या नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतातील मोटर पंप आणि केबल चोरणार्या टोळीतील दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांचा एक सहकारी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. मोर्शी पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींकडून चोरीचा 1 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. मोर्शी आणि परिसरात ग्रामीण भागात शेतातील विहीरीत असणारे मोटरपंप आणि केबलच्या चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. अशा प्रकारच्या तक्रारी अनेक शेतकर्यांनी मोर्शी पोलिस ठाण्यात नोंदविल्या होत्या. गेल्या पंधरवड्यात विक्रमादित्य भोजराज तडस (35, रा. अंबाडा), मनोहर पंजाबराव भोरे (65, रा. कासारपुरा, मोर्शी), श्रेयश नरेंद्र काळे (23, रा. बालाजी नगर, मोर्शी) यांनी शेतातील मोटर पंप, केबल व अन्य हजारो रुपये किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. मोर्शीचे पोलीस निरिक्षक सुरज बोंडे यांनी ही प्रकरणे गांभीर्याने घेत त्यांचे अधिनस्त गुन्हे प्रकटीकरण पथक यांना सदर गुन्हयांचा तपास करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान या चोरीच्या घटनांमध्ये हरिदास मनिरामजी घोडगाव (40) आणि मनोज धनराज मडावी (35, रा. दोघेही नशिरपुर) यांचा हात असल्याची माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेउन चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यांमध्ये गोलु उर्फ सदानंद नथ्थुजी ठाकरे हासुद्धा आपल्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. सदानंद ठाकरे फरार असून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी अटक झालेले दोन्ही आरोपी आणि फरार सदानंद ठाकरे याच्या घरातून चोरीचे सहित्य आणि गुन्हयांमध्ये वापरलेली एक डिस्कव्हर बजाज कंपनिची एमएच 27 / एयु 5419 क्रमांकाची 30 हजार रुपये किंमतीची मोटरसायकल हस्तगत केली. या टोळीने नागपूर जिल्ह्यातील काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एमएच 40 / सीएल 7133 क्रमांकाची 70 हजार रुपये किंमतीची बजाज पल्सर मोटरसायकल चोरली होती. ती फरार आरोपी सदानंद ठाकरे याच्या घरून जप्त करण्यात आली. ही कारवाई कार्यवाही पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुरज बोंडे यांचे नेतृत्वात मोर्शी पोलिस ठाण्यातील उपनिरिक्षक तुषार चव्हाण, छत्रपती करपते, स्वप्नील बायस्कर यांनी केली.




