राज्य सरकारकडून 291 कोटींची मदत मंजूर

अतिवृष्टी, पूरस्थिती बाधित शेतकर्‍यांना मोठा दिलासा

बँकांनी रक्कम कर्ज खात्यात वळती करू नये

मुंबई /3 नोव्हेंबर  : यंदाच्या वर्षी जून ते ऑगस्ट 2026 या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना राज्य शासनाकडून 291 कोटी 91 लाख 4 हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे. यापैकी शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 262 कोटी 69 लाख 95 हजार, तर शेतजमिनीच्या नुकसानीसाठी 29 कोटी 21 लाख 9 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.
याबाबतचे शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांनुसार पात्र शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत देण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबत 3 लाख 9 हजार 289 बाधित शेतकर्‍यांच्या 2 लाख 68 हजार 918 तर 29 हेक्टर क्षेत्रासाठी 262 कोटी 69 लाख 95 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोकण आणि नाशिक विभागातील बाधित शेतकर्‍यांचा यामध्ये समावेश आहे.
या मदतीचा लाभ सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नंदुरबार जिल्ह्यांतील पात्र शेतकर्‍यांना होणार आहे. शेतीपिकांच्या नुकसानीची मदत थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, असेही मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले.अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतजमिनीचेही नुकसान झाले होते. राज्यात शेतपिकाचे नुकसान झालेल्या 34 हजार 984 शेतकर्‍यांच्या 7 हजार 675.40 हेक्टर क्षेत्रासाठी 29 कोटी 21 लाख 9 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अमरावती, नागपूर, कोकण, नाशिक आणि पुणे विभागांतील यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील बाधितांचा यात समावेश आहे. दरम्यान, शेतजमिनीच्या नुकसानीसाठी जमीनमालक असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना विहित दराने जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळेल.

Back to top button