दिशा कासट मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल

जानेवारीत महिला प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी, भारती फुलमाळीला गुजरातकडून पुन्हा पसंती

अमरावती/30 ऑक्टोबर – अमरावतीच्या गुणवान क्रिकेटपटू दिशा कासट हिला आगामी जानेवारी महिन्यात होणार्‍या महिला प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. मुंबई इंडियन्सने बुधवारी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात तिला मूळ किमतीत आपल्या संघात स्थान दिले. यापूर्वी दिशा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून महिला प्रीमियर लीगमध्ये खेळली होती. विशेष म्हणजे अमरावतीची आणखी एक आघाडीची खेळाडू भारती फुलमाळी हिला गुजरात संघाने यंदाही कायम ठेवले आहे. त्यामुळे आगामी स्पर्धेत अमरावतीच्या या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. विदर्भातील चार गुणवान महिला क्रिकेटपटूंना यंदाच्या लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. यामध्ये मोना मेळघम, श्रद्धा नबिरा, गार्गी वानखडे आणि आर्या गोहने यांचा समावेश आहे. मात्र, दिशा कासट हिला पुन्हा एकदा मोठ्या व्यासपीठावर आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळाली आहे. मुंबई इंडियन्ससारख्या बलाढ्य संघाकडून खेळताना तिला आपला ठसा उमटवता येणार आहे. याशिवाय लतिका इनामदार हिलाही 10 लाख रुपयांच्या मूळ किमतीत संघाने संधी दिली आहे. दरम्यान, वरिष्ठ टी-20 स्पर्धेत दिशा कासटने विदर्भाकडून सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मंगळवारी दिशा कासट आणि भारती फुलमाळी यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर विदर्भाने गट साखळीच्या सामन्यात पंजाबवर मात केली होती.

Back to top button