रिद्धपूर अन् शे.घाटमध्ये 620 किलो गोमांस जप्त

सात जनावरांची सुटका; 9 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल

धारदार हत्यारांसह 2 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त
ग्रामीण भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

अमरावती /30 ऑक्टोबर- ग्रामीण भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रिद्धपूर आणि शेघाट येथे एकाच दिवशी मोठी कारवाई करून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 7 गोवंशीय जनावरांची सुटका केली असून 620 किलो गोमांस, चामडे आणि धारदार हत्यारांसह 2 लाख 56 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी दोन्ही गावांतील मिळून 9 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक आणि कत्तल रोखण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी कडक पावले उचलली आहेत. त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनात पथके गस्त घालत असताना खबर्‍यांकडून पक्की माहिती मिळाली. शिरखेड ठाण्याच्या हद्दीतील रिद्धपूर येथील कसाबपुरा भागात आणि शेघाट येथील कुरेशी मोहल्ल्यात काही जण घरातच जनावरांची कत्तल करून मांस विकत असल्याची खात्रीशीर खबर पोलिसांना लागली. माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही ठिकाणी अचानक छापे टाकले. पहिल्या कारवाईत रिद्धपूर येथे जमीर अहमद शेख लाल याच्या घरावर छापा टाकला असता सद्याम हुसेन अब्दुल सादीक, वय 32 वर्षे आणि अफसर खान हमीद खान, वय 55 वर्षे हे दोघे जागीच सापडले. त्यांच्या अंगणाची झडती घेतली असता प्लास्टिकच्या पोत्यावर 120 किलो गोमांस, जनावराचे चामडे आणि इतर सामान मिळून आले. त्यानंतर मोहताशीम इकबाल खान नसीम खान, वय 29 वर्षे याच्या घराची तपासणी केली असता तेथे 70 किलो गोमांस, कुर्‍हाड आणि सत्तूर सापडले. पोलिसांची चाहूल लागताच अब्दुल राजीक ऊर्फ राजू अब्दुल जब्बार हा घरातून पसार झाला. पंचांसमक्ष त्याच्या घराच्या पत्र्याच्या शेडची झडती घेतली असता तिथे 70 किलो गोमांस आणि शेजारी कत्तलीसाठी दोरीने बांधून ठेवलेली 3 जनावरे आढळून आली. या जनावरांबद्दल मोहताशीम याच्याकडे विचारपूस केली असता ही जनावरे त्याने, अब्दुल राजीक आणि फरार असलेला अब्दुल सलमान अब्दुल खलील यांनी मिळून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी रिद्धपूरमधून 260 किलो गोमांस आणि 80 हजार रुपयांची 3 जनावरे असा एकूण 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सद्याम हुसेन, अफसर खान, मोहताशीम इकबाल खान, अब्दुल राजीक, अब्दुल सलमान आणि जमीर अहमद शेख लाल यांच्यावर कारवाई झाली.
दुसर्‍या कारवाईत वरूड तालुक्यातील शेघाट येथील कुरेशी मोहल्ल्यात छापा टाकण्यात आला. तेथे इफतेखार शेख कालु कुरेशी, वय 47 वर्षे याच्या घराची झडती घेतली असता 220 किलो गोमांस, वजनकाटा आणि धारदार पाते सापडले. तसेच घराशेजारी लोखंडी खांबाला तोकड्या दोरीने बांधलेली 4 जिवंत जनावरे बांधलेली आढळली. जवळच असलेल्या मोहम्मद उमेर जमील अहमद कुरेशी, वय 29 वर्षे याच्या जुन्या घरात 65 किलो गोमांस मिळाले. त्याच भागातील जउर अहमद शेख हबीब कुरेशी, वय 57 वर्षे याच्या घराच्या पडवीत 75 किलो गोमांस, धारदार शस्त्रे आणि वजनमापे मिळून आली. पोलिसांनी शेघाटमधून 360 किलो गोमांस आणि 4 जनावरांसह 1 लाख 21 हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला. या तिन्ही आरोपींविरुद्ध शेघाट ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. सुटका केलेल्या सर्व 7 जनावरांची पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून तपासणी करून दाभेरी येथील सिद्धबाल हनुमान गोरक्षण संस्था आणि पुसला येथील भवानीमाता गोसंरक्षण संस्थेत चारापाण्यासाठी रवानगी करण्यात आली.
ही कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक आकाश शिवणकर, पोलीस अंमलदार बळवंत दाभणे, भूषण पेठे, निलेश डांगोरे, गणेश आगोले, श्यामकुमार गावंडे, मंगेश लकडे, रवींद्र वर्‍हाडे, संदीप वानखे, रूपेश गावंडे, शांताराम सोनोने, विवेक घोरमाडे, चालक नईम शहा, कुणाल भोयर आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांनी केली.

Back to top button