नागपूर-अमरावती विभागातील नझुल जमीनधारकांना दिलासा

फ्री-होल्ड, थकीत भाडे व शर्तभंग नियमितीकरण होणार

विशेष अभय योजनेला एक वर्षाची मुदतवाढ

नागपूर /30 ऑक्टोबर: नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी नझुल जमिनींच्या धारकांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. ‘विशेष अभय योजना 2024-25’ ला 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या कालावधीसाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेली मागणी तसेच विविध कारणांमुळे अनेक भाडेपट्टेदारांना यापूर्वीच्या अभय योजनेचा लाभ घेता आला नव्हता. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात यासंदर्भात बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून 2024 मध्ये नझुल जमिनींसाठी अभय योजनेला मुदतवाढ देण्यात आली होती. आता उर्वरित पात्र जमीनधारकांनाही या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी शासनाने पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली आहे.
निवासी प्रयोजनासाठी लिलावाद्वारे किंवा अन्य प्रकारे भाडेतत्त्वावर दिलेल्या नझुल जमिनी भोगवटादार वर्ग-1 (फ्री-होल्ड) करण्यासाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. यासाठी प्रचलित वार्षिक दरसूचीतील (रेडी रेकनर) बाजारमूल्याच्या केवळ 2 टक्के अधिमूल्य आकारण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून भाडेपट्ट्यावर असलेल्या जमिनी मालकी हक्काने मिळविण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

Back to top button