विधान परिषदेच्या निकालावरून भाजप-शिवसेनेत खडाजंगी
भाजपने मित्रपक्षावर फोडले पराभवाचे खापर

मुंबई /29 ऑक्टोबर : विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांचे निकाल समोर आले. यामध्ये महाविकास आघाडीने तीन जागांवर तर महायुतीने 2 जागांवर बाजी मारली. पण, महायुती पाचही जागा जिंकेल, असा विश्वास दाखवणारे भाजपचे नेते सपशेल फेल ठरल्याचे यावेळी दिसून आल्याची टीका विरोधकांनी यावेळी केली. पण या निकालावरून फक्त विरोधकच नव्हे तर भाजपचे आणि शिवसेनेचे नेतेच आपापसात भिडल्याचे चित्र समोर आले आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यावर तसेच शिवसेनेवर गंभीर आरोप केले. त्यावरून शिवसेनेचे नेते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपलाही सुनावले आहे.
विधान परिषदेच्या निकालावरून भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी पराभवाचे खापर शिवसेनेवर फोडले. पुण्यात महायुतीचा उमेदवार असतानाही शिवसेनेने ऐनवेळी अपक्ष सचिन सानप यांना पाठिंबा दिला. सानप यांना शिक्षक मतदारसंघात मिळालेल्या मतांचा परिणाम पदवीधर मतदारसंघाच्या निकालावरही झाला असता. असा दावा त्यांनी केला. शिवसेनेने सानप यांना पाठिंबा दिल्यामुळे भाजपच्या स्मिता जाधव यांना नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले. पुण्यात शिवसेनेचे महानगरप्रमुख रविंद्र धंगेकर यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करू नये, असे आवाहन केले. मित्रपक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अशा प्रकारची भूमिका घेतली जात असेल तर हा गंभीर विषय आहे. असा आरोप त्यांनी यावेळी केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या विरोधात अब्दुल सत्तार यांनी भूमिका घेतली. अमरावतीत भाजपने युतीधर्म पाळत शिवसेनेला मदत केली आणि बंडखोरांवर कारवाई केली. मग पुण्यात धंगेकरांवर कारवाई करणार का? असा थेट सवाल त्यांनी केला.
शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी नवनाथ बन यांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले. एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाचे नेते आहेत, हे आता नवनाथ बन यांना समजले का? हेनिवडणुकीच्या आधी त्यांना समजायला हवे होते. राज्यातील नेतृत्वावर नाराजी आहे, त्यामुळे राज्यातील नेतृत्त्व बदलायला हवे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हवेत, असे म्हणत त्यांनी मोठी मागणी केली. निवडणुका झाल्यानंतर त्यांना हे शहाणपण सूचलं आहे. त्यांना हे शहाणपण पहिल्यांदा सुचायला पाहिजे होते. ते काही जे बोलतात आम्हीच आणि मीच. त्यांच्यामध्ये जो काही हा भाव उतरलेला आहे, त्याचा निकाल जनतेने दिला आहे. जनता लोकांना जागेवर आणून ठेवते, त्याचे काम जनतेने केले आहे. कौल सर्वांनी मान्य केला आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
भाजपच्या आरोपांवर प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. नुकतेच झालेल्या 5 विधानपरिषद जागेमध्ये अधिक समन्वय असता तर पाचही जागा निवडून आल्या असत्या. भाजप यामध्ये मुख्य भूमिकेत होती. पुण्यातील एक जागा शिवसेनेला मिळावी ही मागणी होती. भाजपने तीनही उमेदवार जाहीर केले. शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी अर्ज दाखल केला होता, तो त्यांनी नंतर मागे घेतला. आमची आधीपासून मागणी होती, एक जागा अजून पाहिजे होती. त्यानंतर शिवसेनेने अपक्ष सचिन सानप यांना पाठिंबा दिला. असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली. अब्दुल सत्तार यांनी विरोधात काम केले असे आरोप नवनाथ बन यांनी केले. यावर ते म्हणाले की, जगातील सर्वात मोठा पक्ष असे कायम सांगत असतात. भाजपच्या बंब यांनी कुणाचा प्रचार केला? हे त्यांनी सांगावे, असे म्हणत त्यांनी भाजपला सवाल केला.





