विधान परिषदेत महाआघाडीचे वर्चस्व

पाचपैकी तीन जागांवर मात

महायुतीला दोन जागांवर मानावे लागले समाधान
नागपूरच्या बालेकिल्ल्यात भाजपला मोठा धक्का

पुणे, संभाजीनगर, अमरावतीचे निकाल ठरले निर्णायक

अमरावती/28 ऑक्टोबर  – राज्यातील पाच विधानपरिषद जागांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली असून महायुतीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने दुसर्‍या पसंतीच्या मतांवर विजय खेचून आणत महायुतीला मोठा धक्का दिला. संभाजीनगर पदवीधरमध्ये शरद पवार गटाने तर पुणे पदवीधरमध्ये आघाडीने बाजी मारली. दुसरीकडे अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदे सेनेने विजय मिळवला तर पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप उमेदवाराने बाजी मारली. थेट जनसंपर्क आणि मतदारांशी बांधलेली घट्ट नाळ यामुळेच आघाडीने ही निवडणूक जिंकल्याचे निकालावरून स्पष्ट दिसत आहे.
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी 23 तारखेला चुरशीने मतदान पार पडले. यामध्ये पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ, संभाजीनगर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाचा समावेश होता. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सुरुवातीपासूनच बारकाईने नियोजन करत मतदारांशी थेट संवाद साधला. शेवटच्या टप्प्यापर्यंत केलेल्या आक्रमक प्रचाराच्या जोरावर आघाडीने महायुतीसमोर मोठे आव्हान उभे केले.संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील यांनी मोठा विजय मिळवला. त्यांनी अजित पवार गटाचे विद्यमान आ. सतीश चव्हाण यांचा पराभव केला. स्थानिक पातळीवरील दांडगा संपर्क, मतदारांशी थेट गाठीभेटी आणि आखलेले नियोजन यामुळेच प्रतापसिंह पाटील यांना हा विजय मिळवता आला. या निकालामुळे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून मतदारसंघातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलून गेली आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघात नवख्या असलेल्या हर्षदा जाधव देशमुख यांनी भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव यांच्यावर मात करत शानदार विजय संपादन केला. तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर देत त्यांनी प्रचारात सातत्य राखले. केवळ प्रस्थापित राजकीय ताकदीवर निवडणूक जिंकता येत नाही, तर मतदारांशी थेट नाळ आणि संघटनात्मक बांधणी किती महत्त्वाची असते, हेच या निकालाने पुन्हा दाखवून दिले.
अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाचे किरण सरनाईक यांनी स्वपक्षातील बंडखोरांना मागे टाकत विजय साकार केला. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि समन्वयाचा अभाव यामुळे काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे यांना पराभवाचा फटका बसला. या विजयामुळे महायुतीचे आणखी एक खाते उघडले असले तरी इतर महत्त्वाच्या जागांवरील पराभवामुळे महायुतीचा हा आनंद मर्यादितच राहिला.
भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या गेलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघातील निकालाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत आघाडी मिळाली होती. मात्र अवैध मतांची संख्या जास्त असल्याने त्यांना विजयाचा निश्चित कोटा गाठता आला नाही. परिणामी दुसर्‍या पसंतीच्या मतांची मोजणी अत्यंत निर्णायक ठरली. या दुसर्‍या फेरीत काँग्रेसचे विद्यमान आ. अभिजीत वंजारी यांनी मुसंडी मारली. त्यांना नितेश कराळे यांच्या दुसर्‍या पसंतीच्या मतांचा मोठा फायदा झाला आणि विजयाचे पारडे काँग्रेसच्या बाजूने झुकले. नागपूरसारख्या मजबूत गडात मिळालेला हा पराभव भाजपसाठी आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरला आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सचिन सानप यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवत संभाव्य विजयी उमेदवार भाजपचे कौस्तुभ गावडे यांचे अभिनंदन केले. मुख्य लढत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे आणि माझ्यामध्येच रंगली होती, त्यामुळे मतांच्या विभाजनाचा प्रश्नच येत नाही, असे सानप यांनी स्पष्ट केले. पैशांच्या वाटपाच्या आरोपांवर बोलताना शिक्षकांना कोणीही बदनाम करू नये अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Back to top button