मी खरंच वाट बघतोय..
महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय - राज ठाकरे

मुंबई /26 ऑक्टोबर – वाशी येथे मनसेच्या वाहतूक सेनेचा मेळावा झाला. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी वाहतूकदारांच्या समस्यांना हात घालत, शहरातील वाहतूक समस्येवर उपस्थितांना संबोधित केले.
यावेळा बोलताना ठाकरे म्हणाले, आपल्या देशात वाहतुकीची समस्या अत्यंत वाईट आहे. कुणाचा कशाशी पायपोस नाही. रस्त्याने धड चालताही येत नाही. आपल्या शहरांना आकार नाही. आपल्याकडे बागा नाहीत.
आपल्याकडे शिस्त नाही आणि सांगणार जीडीपी वाढला. आपले तलाव बुजवले जात आहेत. तिकडे वस्त्या उभ्या राहतात, त्यांना टँकरने पाणी दिले जाते, असा संताप व्यक्त करतानाच महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय, त्याची मी वाट बघतोय. खरंच वाट बघतोय.
अशा प्रकारची शिस्त लावणे हे काही रॉकेट सायन्स नाही. मी आता काही आपल्या वाहतूकदार बांधवांशी बोललो. त्यांचे प्रश्न समजून घेतले. वाहतूकदारांशी चर्चा केली. त्यातील एक प्रश्न वाहतुकीशी होता. मी अनेकदा भाषणात हा विषय काढला आहे.
आता ई -चलानचा विषय काढला. ई- चलनाला विरोध नाही. पण ज्या प्रकारे ई- चलन लावले जातात त्या गोष्टी तपासल्या पाहिजे. ई- चलन कॅमेर्यावर आले पाहिजे. कोणी तरी जातो आणि ई- चलन फाडतो, असे होता कामा नये, असे राज ठाकरे म्हणाले.
आज देशातील वाहतुकीचा प्रश्न इतका गंभीर आहे. ही समस्या पुढे अक्राळविक्राळ होणार आहे. आताही झालेली आहे. कोणत्याही गोष्टीची बंधने नाहीत, ही समस्या सोडवण्यासाठी चौकट आपल्याकडे घातली गेली नाही.
आपल्या वाहतुकीवरून आपल्या देशाचे भवितव्य दिसते. कुठेही गाड्या पार्क केल्या जातात. आपल्याकडे फक्त पुल बांधले जातात. परत दोन वर्षात कामे निघावीत म्हणून रस्ते बांधले जातात, असेही ठाकरेंनी म्हटले.





