अधिवेशनापूर्वी अर्थखाते राष्ट्रवादीला मिळणार
’वर्षा’वर एनसीपी नेत्यांनी घेतली सीएम फडणवीसांची भेट

मुंबई /25 ऑक्टोबर- अजित पवारांच्या निधनानंतर अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे घेतले होते. मात्र आता हे खाते परत मिळावे यासाठी राष्ट्रवादीचा प्रयत्न सुरू आहे. आज राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी नेत्यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांकडे अर्थखाते पुन्हा मागितले आहे.
या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. बरेच दिवस झाले आमचे अर्थखाते हे पुन्हा परत द्यायला हवे. याबाबत अनेक चर्चा आमदारांमध्ये सुरू आहेत. त्यामुळे हे योग्य नाही. अर्थ खाते पुन्हा मिळावे अशी चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत झाली. ते सकारात्मक होते. सध्या दुष्काळ आणि इतर परिस्थिती राज्यात आहे ते पाहतो. त्यानंतर निश्चित हे खाते राष्ट्रवादीला देतो असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले. हिवाळी अधिवेशनापूर्वीहे खाते आम्हाला मिळेल अशी शक्यता आहे असं विधान एनसीपी नेते छगन भुजबळ यांनी केले. तसेच 5 मंत्री बदलणार वैगेरे बातम्या सुरू आहे. अशी कुठलीही चर्चा झाली नाही. या बातम्या दुरुस्त कराव्यात. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू आहे. नेते भेटल्याची बातमी आहे. मात्र अशा प्रकारे कुठलाही अजेंडा आजच्या बैठकीत नव्हता. अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. मंत्री बदलणार असेही काही घडलेले नाही. त्याची जरासुद्धा चर्चा घडली नाही असं भुजबळांनी स्पष्ट केले.





