गर्भवती महिलेसह बाळाचा मृत्यू

आरोग्य प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड

मेळघाटात सरकारी अनास्थेने मायलेकाचा जीव घेतला

चार रुग्णालयांत फिरवूनही महिलेला वेळेवर उपचार मिळेना

डफरिनच्या दारात तासनतास ताटकळल्याने प्रकृती अधिक बिघडली

नागपूर मेडिकलमध्ये आईने घेतला अखेरचा श्वास

अमरावती /25 ऑक्टोबर – मेळघाटातील काटकुंभ (चिखलदरा) परिसरातील सलमा परवीन शेख हनीफ यांना शुक्रवारी सकाळी प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यांची ही चौथी प्रसूती असल्याने कुटुंबीयांनी कोणतीही जोखीम न पत्करता सकाळी 10 वाजता त्यांना चिखलदरा येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील अपुर्‍या सुविधांमुळे त्यांना परतवाडा येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. परतवाड्यातून पुन्हा अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. अचलपूरच्या डॉक्टरांनी महिलेची नाजूक अवस्था पाहून थेट अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालय म्हणजेच डफरिनमध्ये नेण्याचा सल्ला दिला. सुमारे सव्वाशे किलोमीटरचा खडतर प्रवास करत नातेवाईक दुपारी 4 वाजता महिलेला घेऊन डफरिनमध्ये पोहोचले. मात्र एवढ्या लांबून आलेल्या गंभीर रुग्णावर तातडीने उपचार सुरू करण्याऐवजी तिथल्या यंत्रणेने त्यांना तब्बल 4 तास ताटकळत ठेवले.
या भयानक दिरंगाईमुळे पोटातच बाळाची हालचाल मंदावली आणि काही वेळातच गर्भातील बाळाचे ठोके कायमचे थांबले. बाळ दगावल्याचे समजताच नातेवाइकांवर आभाळ कोसळले. डफरिनमधील डॉक्टरांनी इर्विन रुग्णालयात खाट उपलब्ध असल्याचे सांगून जबाबदारी झटकली, पण तिथे पोहोचल्यावर तातडीने वॉर्डात दाखल करण्याऐवजी महिलेला तासनतास केवळ अपघात कक्षात पडून राहावे लागले. महिलेची प्रकृती हाताबाहेर गेल्याचे दिसताच डॉक्टरांनी तिला रात्री नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यास सांगितले.
अत्यवस्थ महिलेला तातडीने नागपूरला नेण्यासाठी तिचे भाऊ शेख आसिफ शेख गफूर आणि नातेवाइकांनी आपत्कालीन 108 रुग्णवाहिकेसाठी 10 ते 20 वेळा फोन लावले. मात्र सरकारी यंत्रणेकडून रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. अखेर नातेवाइकांनी उधार-उसनवार करून पदरमोड करत खासगी वाहनाची सोय केली आणि रात्री नागपूरच्या दिशेने धाव घेतली. नागपूर मेडिकलमधील अतिदक्षता विभागात डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण उपचारांना खूप उशीर झाला होता. अखेर रविवारी सकाळी 7 वाजता सलमा परवीन यांचा मृत्यू झाला.
आई आणि बाळाच्या या मृत्यूमुळे अवघा मेळघाट सुन्न झाला आहे. सलमा परवीन यांच्या जाण्याने त्यांच्या तीन निष्पाप चिमुकल्या मुलींचे मातृछत्र कायमचे हरपले असून त्या अनाथ झाल्या आहेत. या धक्कादायक घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचे तीन-तेरा उघडे पडले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून अहवाल आल्यावर संबंधितांवर नियमानुसार योग्य कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण परिसे यांनी सांगितले.

डॉक्टरांचा निष्काळजीपणा मृत्यूस कारणीभूत
मेळघाटातून निघालेल्या गरोदर मातेला चिखलदरा, परतवाडा, अचलपूर आणि डफरिन अशा चार ठिकाणी चकरा माराव्या लागल्या. डफरिन रुग्णालयात दुपारी चार वाजता दाखल करूनही चार तास वरिष्ठ डॉक्टरांनी रुग्णाकडे लक्ष दिले नाही. या वेळेत योग्य उपचार मिळाले असते तर गर्भातील निष्पाप बाळाचा जीव वाचला असता, असा नातेवाइकांचा थेट आरोप आहे.
108 रुग्णवाहिकेसाठी ऐनवेळी न मिळाल्याने रोष
महिलेची प्रकृती खालावल्यानंतर डॉक्टरांनी नागपूरला नेण्याचा सल्ला दिला. परंतु आपत्कालीन 108 रुग्णवाहिकेसाठी नातेवाइकांनी तब्बल वीस वेळा संपर्क करूनही गाडी मिळाली नाही. सरकारी मदतीची वाट पाहून शेवटी कुटुंबीयांना पदरमोड करत खासगी गाडीने नागपूर गाठावे लागले. ऐन संकटात ही जीवनदायी सेवा न मिळाल्याने रुग्णाचा मौल्यवान वेळ वाया गेला.
चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करून अहवाल मागवण्यात आला आहे. रुग्णालयातील उपचारांची वेळ, दाखल केलेल्या नोंदी आणि रुग्णवाहिकेचा अभाव या सर्व मुद्द्यांची बारकाईने तपासणी केली जाईल. चौकशीत निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण परिसे यांनी स्पष्ट केले.

Back to top button