किनगावात आरएसएसच्या पथसंचलनावर दगडफेक

पोलिसांचा सौम्य लाठीमार, प्रचारकासह पोलीस जखमी

जमावाला पांगवून संचलन पूर्ण, संशयित पोलिसांच्या ताब्यात

जळगाव /25 ऑक्टोबर : यावल तालुक्यातील किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नियोजित विजयादशमी पथसंचलनावरून रविवारी (दि. 25) सकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. संचलनाच्या मार्गाला विरोध करत रस्त्यावर बसलेल्या आंदोलकांपैकी काहींनी अचानक दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले. या दगडफेकीत संघाचे जिल्हा प्रचारक आणि काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. संचलनाचा मार्ग नायगाव मुख्य रस्त्यावरून निश्चित होता आणि पोलिसांनी या मार्गाला रीतसर परवानगीही दिली होती. मात्र, सकाळी काही नागरिकांनी या मार्गावर आक्षेप घेत रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्यासह दंगा नियंत्रण पथक आणि मोठा फौजफाटा तातडीने किनगावात दाखल झाला. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र, आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
चर्चेनंतरही परिस्थिती निवळत नसल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. या घटनेत संघाचे जिल्हा प्रचारक आणि कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी जखमी झाले. अचानक उद्भवलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी तातडीने अतिरिक्त बळाचा वापर करत जमावाला पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणून ठरलेल्या मार्गावरून पथसंचलन पूर्ण केले.

Back to top button