प्रवासी महिलेचे 6.74 लाखांचे दागीणे उडविले
चांदुर बाजार बसस्थानकावरील घटना

अमरावती / 30 जून: बसमध्ये चढत असताना एका प्रवासी महिलेच्या पर्समधील 6 लाख 74 हजार रुपये किंमतीचे 110 ग्राम वजनाचे सोन्याचे दागीणे अज्ञात चोरट्याने गर्दीचा गैरफायदा घेउन लंपास केले. ही घटना चांदुर बाजार बसस्थानकावर रविवारी दुपारी घडली. या घटनेने बसस्थानकावरील प्रवाशांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती.
यासंदर्भात सौ. सारिका संजय लांडे (रा. मोझरी गुरुकुंज, ता. तिवसा) यांनी चांदुर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सौ. सारिका लांडे या करजगाव वरुड येथे आपल्या दोन मुलींसह भावाकडे आल्या होत्या. रविवारी दुपारी गुरुकुंज मोझरी येथे जाण्यासाठी तिघींनाही भावाने चांदुर बाजार बसस्थानकावर आणून सोडले. सारिका लांडे यांच्या पर्समध्ये 110 ग्रमा वजनाचे 6 लाख 74 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीणे होते. चांदुर बाजार – तिवसा बसमध्ये त्या चढत होत्या. यावेळी बसमध्ये चढणार्यांची मोठी गर्दी होती. त्याचाच गैरफायदा घेउन अज्ञात चोरट्याने लांडे यांच्या पर्सची चेन उघडली आणि त्यामधील सोन्याचे दागीणे लंपास केले.
बसमध्ये चढल्यानंतर सारिका लांडे यांना पर्सची चेन उघडी दिसली आणि त्यातील सोन्याचे दागीणे गायब असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांना जबर धक्का बसला. लगेच बसमधून उतरुन त्यांनी आपल्या भावासह चांदुर बाजार पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रामुख्याने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकांवर महिला प्रवाशांना लक्ष करुन त्यांचा ऐवज चोरण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. या बसस्थानकांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि पोलिस बंदोबस्त राहत नसल्याने चोरट्यांचे फावत असल्याचे, बोलले जात आहे.




