एएसआय कलाम यांच्या मारेकर्यांकडून आता कुटुंबाला धोका
सुरक्षा देण्याची कलाम यांच्या कुटुंबियांची मागणी

-पत्नी व मुलींनी घेतली डीसीपी सागर पाटील यांची भेट
अमरावती / 30 जून: पोलिस खात्यात 34 वर्ष सेवा देणारे वलगाव ठाण्यातील एएसआय अब्दुल कलाम अब्दुल कदीर यांची शनिवारी नवसारी परिसरात निर्घुन हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात पोलिसांनी कलाम यांच्या तीन मारेकर्यांना अटक केली असली तरी आणखी काही आरोपी अद्यापही फरार असून त्यांच्यापासून कुटुंबियांच्या जिविताला धोका असल्याची भीती कलाम यांच्या पत्नी आणि मुलीने व्यक्त केली आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबाला सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
आज दुपारी दिवंगत एएसआय अब्दुल कलाम यांची मुलगी तहेरिम फातिमा हिने कुटुंबातील अन्य सदस्य व नातेवाईकांसह उपायुक्त सागर पाटील यांची भेट घेतली. आपल्या वडिलांचे काही मारेकरी अजूनही गजाआड झाले नसून त्यांच्यापासून आमच्या कुटुंबियांच्या जिविताला धोका आहे, त्यामुळे आम्हाला सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी तहेरिम हिने उपायुक्तांकडे केली. उपायुक्त सागर पाटील यांनीही कलाम यांच्या निवासस्थानाजवळ पेट्रोलिंग वाढवून व लक्ष ठेवून सुरक्षा देण्याचा शब्द तिला दिला. आपल्या वडिलांच्या सर्व मारेकर्यांना तात्काळ अटक करुन त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिस प्रशासनाने प्रयत्न करावे, अशी मागणीही तहेरिम हिने निवेदनातून केली आहे.




