मोर्शीत फायनांस कंपनीचे 12 लाख लुटणारी टोळी जेरबंद
7 जणांना अटक, ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई

-6 आरोपी नागपूर, नरखेडचे रहिवासी
अमरावती / 30 जून: मोर्शी शहरात 25 जून रोजी दिवसाढवळ्या एका फायनांस कंपनीच्या दोन दुचाकीस्वार कर्मचार्यांवर हल्ला करुन तब्बल 12 लाख रुपयांची रोकड लुटून नेणार्या टोळीला जेरबंद करण्यात ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाला यश प्राप्त झाले आहे. टोळीतील 7 सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींपैकी सहा जण नागपूर आणि नरखेड येथील तर एक जण मोर्शी तालुक्यातील रहिवासी आहे.
जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी आज एका पत्रकार परिषदेत गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईची माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तौसिफ खां शरीफ खां (22, रा. येरला, ता. मोर्शी), तनीश उर्फ क्रिष्णा उर्फ गोट्या धनंजय पेंदाम (21) आणि एक अल्पवयीन मुलगा (दोघेही रा. नागपूर), विशाल उर्फ वंश राजेश खत्री (21), यश उर्फ आरु रविंद्र टेकाडे (23), शेख साहिल उर्फ मोनू शेख शफी (24) आणि शेख समीर उर्फ सोनू शेख शफी (22, सर्व रा. नरखेड, जि. नागपूर) यांचा समावेश आहे.
अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले की, वरुड तालुक्यातील आमनेर येथील रहिवासी शुभम गुणवंत मस्के (25) याने याबाबत मोर्शी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 25 जून रोजी दुपारी शुभम मस्के हा आपला सहाकरी शालिकराम धिकार यांच्यासह मायक्रो फायनांस कंपनीची वसून केलेली 12 लाख 39 हजार 639 रुपयांची रोकड एका बॅगमध्ये भरुन भारतीय स्टेट बँकेच्या मोर्शी शाखेत भरण्यासाठी दुचाकीवरुन नेत होते. शिवाजी हायस्कुलनजीक एका दुचाकीवरुन तिघेजण मागून आले आणि त्यांनी शुभमच्या दुचाकीला धक्का देवून दोघांनाही खाली पाडले. त्यानंतर त्यांनी पैशांनी भरलेली बॅक हिसकून तेथून पळ काढला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे मोर्शी शहरात चांगलीच खळबळ उडाली होती.
मोर्शी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनीही घटनास्थळी भेट दिली होती. पोलिस अधीक्षकांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे निर्देश ग्रामीण गुन्हे शाखेला दिले होते. गुन्हे शाखेने तपासासाठी तीन पथक गठित करुन वेगवेगळ्या जिल्ह्यात पाठविले. उपनिरिक्षक सागर हटवार यांच्या पथकाने विविध मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याआधारे आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु असतानाच शेख समीर उर्फ सोनू, शेख साहित उर्फ मोनू, यश उर्फ आरु, विशाल उर्फ वंश यांना एका विना क्रमांकाची पल्सर आणि एमएच 01 / बीयू 2352 क्रमांकाची होंडा सीटी कार यामध्ये हिवरखेड ते मोर्शी मार्गावर मायवाडीनजीक संदेहास्पद स्थितीत फिरताना पोलिसांनी ताब्यात घेतले. या युवकांचा मोर्शीच्या घटनेत हात असावा, असा संशय पोलिसांना आला. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. सर्व आरोपींना पुढील तपासासाठी मोर्शी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
-शेख समिर याच कंपनीत होता कामाला
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख समिर हा मुख्य सूत्रधार आहे. तो एक वर्षांपूर्वी याच क्रेडिट एक्सेस मायक्रो फायनांस कंपनीत मोर्शी शाखेत कामाला होता. आता तेथे येरला येथील तौसिफ खां शरीफ खां हा काम करतो. तौसिफचा परिचय असल्याने समिरने त्याच्याकडून कंपनीच्या व्यवहाराबाबत संपूर्ण माहिती घेतली होती. त्यानंतर त्यानेच आपला भाउ शेख साहिल, मित्र वंश खत्री आणि एका अल्पवयीन आरोपीसह रक्कम लुटण्याची योजना आखली. सर्व आरोपी नागपूर वरुन मोर्शीला आले. वाटेत ते चार किलोमीटर आधी थांबले. तेथून वंश खत्री आणि तनीश तसेच अल्पवयीन मुलगा मोर्शीत दुचाकीने आले. त्यांनी फायनांस कंपनीच्या ऑफीजवळ रेकी केली. अडिच वाजता शुभम मस्के आणि त्याचा साथीदार दुचाकीने ऑफिसमधून बाहेर पडताच त्यांनी शिवाजी हायस्कलसमोर डाव साधला आणि रोकड हिसकून पसार झाले.
-नरखेड मार्गे गाठले नागपूर
मोर्शीत 12 लक्ष रुपयांची रोकड लुटल्यानंतर तिघे मोर्शीपासून 4 किलोमीटर अंतरावर उभ्या असलेल्या आपल्या साथीदारांजवळ पोहोचले. तेथे कारमध्ये रक्कम ठेवून सर्वजण नरखेड मार्गे नागपूरला गेले. तेथे वंश खत्री याच्या फ्लॅटवर त्यांनी लुटलेल्या रकमेचे वाटप केले. सोनू, वंश आणि अल्पवयीन आरोपी यांनी प्रत्येकी 3 लाख रुपये घेतले. आरु टेकाडे याला 20 हजार रुपये देण्यात आले. पोलिसांनी अन्य आरोपी तौसिफ खान, तनीश पेंद्राम यांना नागपूरात हिलटॉप परिसरातून अटक केली. पोलिसांनी 1 लाख रुपये रोख, गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार, दुचाकी आणि 4 मोबाईल जप्त केले आहे.




