भाजपची पक्षशिस्त मोडली; चौघांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी

चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे, सुमित पवार, नितीन गुडधे यांना दणका

शिक्षक मतदारसंघात बंडखोरी पडली महागात

ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. प्रताप अडसड यांची कारवाई

अमरावती/11ऑक्टोबर– शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत पक्षाच्या आदेशाविरोधात काम केल्याने भाजपने चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे, सुमित पवार, नितीन गुडधे या चौघांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले असून ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ प्रताप अडसड यांनी ही कठोर कारवाई जाहीर केली.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला होता. पक्षाने सर्व कार्यकर्त्यांना अधिकृत उमेदवाराचेच काम करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे, सुमित पवार, नितीन गुडधे या चौघांनी पक्षाच्या आदेशाला न जुमानता वेगळी भूमिका घेतली. त्यांनी पक्षशिस्त मोडून विरोधी काम केल्याच्या तक्रारी पक्षाकडे आल्या होत्या.
या तक्रारींची गंभीर दखल ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीने घेतली. जिल्हाध्यक्ष आ प्रतापदादा अडसड यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून अहवाल पाठवला. त्यानंतर पक्षाच्या शिस्त समितीने चौघांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली. मात्र त्यांचे स्पष्टीकरण समाधानकारक आढळले नाही. पक्षाच्या विरोधात काम करणे हे गंभीर मानले गेले.
अखेर पक्षाने कठोर पाऊल उचलत चौघांनाही 6 वर्षांसाठी पक्षातून निष्कासित करण्याचा निर्णय घेतला. यापुढे त्यांचा पक्षाशी कोणताही संबंध राहणार नाही. या कारवाईमुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, शिस्त पाळावीच लागेल असा स्पष्ट संदेश या कारवाईतून दिला गेला आहे.

शिस्तभंगावर भाजपची कठोर भूमिका
भाजपने यापूर्वीही पक्षशिस्त मोडणार्‍यांवर कडक कारवाई केली आहे. यंदा शिक्षक मतदारसंघात आदेश धुडकावून काम केल्याने चौघांवर थेट 6 वर्षांची बंदी घातली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये शिस्तीचा संदेश गेला असून भविष्यात बंडखोरी करणार्‍यांना धडा मिळेल. पक्ष मोठा करण्यासाठी एकजुटीने काम करावे लागेल असेही पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे आणि शिस्त पाळणे बंधनकारक राहणार आहे

Back to top button