चिखलदर्‍याच्या अल्पवयीन मुलीवर अमरावती बलात्कार

आरोपीने पिडितेच्या आईलाही धमकावले

अमरावती / 29 जून: चिखलदरा तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या 14 वर्षीय विद्यार्थीनीवर त्याच गावात राहणार्‍या 19 वर्षीय युवकाने अमरावती येथे कठोरा नाका परिसरात एका निर्माणाधिन इमारतीत बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने पिडितेच्या आईलाही जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पिडितेच्या तक्रारीवरुन चिखलदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुर्गेश रमेश राजने असे आरोपीचे नाव आहे.
रमेश आणि पिडिता एकाच गावातील रहिवासी असून त्यांचा एकमेकांसोबत परिचय आहे. 14 वर्षीय पिडिता ही अमरावती येथे शिक्षण घेते आणि परतवाडा येथून बसने त्यासाठी ये-जा करते. 26 जून रोजी दुपारी पिडिता बसने अमरावतीला येत असताना आरोपी दुर्गेश राजने हासुद्धा त्याच बसमध्ये होता. कठोरा नाक्याजवळ बस येताच दुर्गेशने या मुलीची बॅग हिसकली आणि तिला जबरदस्तीने बसमधून खाली उतरविले. त्यानंतर कठोरा नाका परिसरात मुख्य मार्गापासून सुमारे 500 मीटर अंतरावर असलेल्या एका निर्माणाधिन इमारतीत तो मुलीला घेउन गेला. इमारतीच्या आवारात एका झोपडीत त्याने पिडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध स्थापित केले.
26 जूनला रात्रभर त्याने पिडितेला या निर्जनस्थळी ओलिस ठेवून तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केला. दुसर्‍या दिवशी सकाळी 8 वाजता तो मुलीला शाळेत सोडून देण्याचे सांगून तेथून निघाला. दरम्यान पिडितेची आई मुलीचा शोध घेत होती. आई आणि तिच्यासोबत असलेल्या प्रकाश घाटे नामक इसमास आरोपी आणि पिडिता दिसले. तेव्हा पिडितेने आपबीती आपल्या आईला सांगितले. त्यानंतर सर्वजण एकाच बसने आपल्या गावी जाण्यास निघाले. घटांग येथे बस थांबल्यानंतर आरोपी दुर्गेशने पिडितेच्या आईला शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी देवून पळून गेला. पिडितेने आईसह चिखलदरा पोलिस ठाण्यात जावून तक्रार नोंदविली. त्याआधारे पोलिसांनी आरोपी दुर्गेश राजनेवर बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button