संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे

विजय कोंबे यांचे प्रतिपादन

विभागीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर यवतमाळ येथे उत्साहात

पाच जिल्ह्यांतील पदाधिकारी व सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग

अमरावती/4 ऑक्टोबर  : शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करताना संघटनेची वैचारिक आणि संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करण्याची गरज आहे. बदलत्या शैक्षणिक परिस्थितीत शिक्षकांसमोरील आव्हाने वाढत असून, या आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने संघटनेची ध्येयधोरणे समजून घेऊन सक्रियपणे कार्य करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी केले.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती 448/64, पुणे यांच्या वतीने आयोजित अमरावती विभागीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर शनिवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी सहकार भवन, यवतमाळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यांतील जिल्हा व विभागीय पदाधिकारी, तालुका पदाधिकारी आणि शिक्षक समितीच्या सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात राज्य नेते उदय शिंदे यांनी ‘संघटना बांधणी व शिक्षकांसमोरील आव्हाने’ या विषयावर अत्यंत प्रभावी व सखोल मार्गदर्शन केले. संघटनेची ताकद ही कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागातून निर्माण होते. शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी संघटनात्मक एकजूट, सातत्यपूर्ण संपर्क आणि कार्यकर्त्यांची वैचारिक बांधिलकी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. प्रशांत गावंडे यांनी ‘शिक्षण : काल, आज आणि उद्या’ या विषयावर मार्गदर्शन करताना शिक्षण क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल, त्यांचा शिक्षक व विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम आणि भविष्यातील शैक्षणिक आव्हाने यावर सविस्तर भाष्य केले. राजन कोरगावकर यांनी ‘अशी घडली शिक्षक समिती’ या विषयातून शिक्षक समितीच्या आजवरच्या वाटचालीचा इतिहास आणि संघर्षमय प्रवास उलगडून सांगितला. शिक्षकांच्या सेवेशी संबंधित सेवा शर्ती, अधिनियम, रजा, सेवाविषयक ध्येयधोरणे आणि सेवा पुस्तकाशी संबंधित विविध बाबींवर राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी सखोल मार्गदर्शन केले. शिक्षकांनी आपल्या सेवाविषयक अधिकारांची तसेच कर्तव्यांची अचूक माहिती करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक नेते सुरेश पवार, सोलापूर यांच्या ‘चक्रव्यूहात शिक्षण’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते सहकार भवन येथे विमोचन करण्यात आले. या पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर विचारमंथनाला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरावती विभागीय अध्यक्ष गोपाल सुरे यांनी केले. कुमुद डाखोळे यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर यवतमाळ जिल्हा सरचिटणीस संजय काळे यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी सतिश सागळे, करण्याकरीता यवतमाळचे संदीप मोहाडे,महेश सोनेकर,अर्चना भरकाडे, प्रविणा कोल्हे,मुकेश भोयर, संजय काळे,अजयानंद पवार, शैलेश दहातोंडे,राजेश देशमुख, प्रशांत आकोत,विनोद घुगे,राजु महाले,प्रविण बाहेकर,सुनिल मगर पाचही जिल्ह्यांतील शिक्षक समितीच्या पदाधिकारी व सभासदांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे प्रशिक्षण शिबिराला व्यापक प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांना संघटनात्मक कार्याची दिशा, शिक्षकांच्या सेवाविषयक प्रश्नांची माहिती, शैक्षणिक क्षेत्रातील बदलांचे आकलन आणि परस्पर विचारविनिमयाची संधी या शिबिरातून मिळाली. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघटनात्मक एकजूट अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करत हे प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.

Back to top button