गोळी मारून गांधी संपत नाही
अभिजीत दीपकेंचा संघ, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत आंदोलन
मुंबई /2 सप्टेंबर : कॉक्रोच जनता पार्टी (2 ऑक्टोबर) दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याकरीता ‘जेल भरो’ आंदोलन करत आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सीजेपीच्या माध्यमातून जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने झेन जी आणि नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
अभिजीत दीपके म्हणाले की, एखादा महामानव येईल आणि म्हणेल की, मी नॉन बायोलॉजिकल आहे. पण सांगायची गरज नाही, कारण तुम्ही पुरुषच नाही. ते स्वत:ची तुलना गांधी आणि नेहरूंशी करत आहेत. पण गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांच्यापेक्षा मोठं होण्याची तुमची योग्यता नाही. कारण गांधी देशाचा आत्मा आहे, आंबेडकर देशाचा कणा आहेत आणि नेहरू देशाचे ज्ञान आहेत. तुम्ही त्यांची बरोबरी करू शकत नाही. गोळी मारून गांधींना संपवू असं संघीना वाटलं होतं. पण गांधी मरत नसतात. इथे जमलेला प्रत्येकजण गांधी आहे. जोपर्यंत या देशात आम्ही आहोत, तोपर्यंत गांधी जिवंत आहेत. गोडेस येतील आणि जातील, पण हा देश गांधींच्या विचारावर टिकून आहे. गांधी नसते तर हा देश नसता. त्यामुळे कितीही प्रयत्न करा. गांधींना तुम्ही संपवू शकत नाही, असा इशारा दीपके यांनी दिला.
अभिजीत दीपके म्हणाले की, फक्त निवडणूक जिंकणं एवढंच यांचं काम आहे. निवडणुका जिंकून आम्ही गांधी, नेहरू आंबेडकरांपेक्षा मोठं होऊ, असं यांना वाटतं. पण यांना या महापुरुषांचा संघर्ष माहीत नाही. जेव्हा लोकांना मतदानाचा अधिकार माहीत नव्हता, मतदान काय असतं हे माहीत नव्हतं, लोकसभा व विधानसभा काय हे माहीत नव्हतं. तेव्हा नेहरू आणि आंबेडकारांनी त्यांना हे अधिकार दिले. इतकं महान कार्य या महापुरुषांनी केलं आहे आणि दोन-चार निवडणुका जिंकल्यावर यांना महापुरुष झाल्यासारखं वाटत आहे, अशी टीका दीपके यांनी केली.
पंतप्रधान मोदींवर टीका करताना अभिजीत दीपके म्हणाले की, पंतप्रधान मोदी सारखं म्हणतात. मी चहा विकून इथपर्यंत आलो. पण आम्ही तुम्हाला चहा विकायला सांगितलं होतं का? शाळेत जायचं होतं, शिकायचं होतं, नोकरी करायची होती, असा टोला लगावत अभिजीत दीपके म्हणाले की, मोदी वारंवार सांगतात मी गरीब आईचा मुलगा आहे. गरीब आईचा मुलगा होतात म्हणून तुमच्यामुळेच देशातील मुलं गरीब झाली आहेत. तुमच्यामुळे सर्वजण गरीब झाले आहेत. कारण या देशाला धोरण नाही. देशाचा विकास कसा करायचा यांना माहीत नाही. यांना फक्त फॅशनचा सेन्स आहे. केवळ फॅशन केली जाते आणि आमच्या पैशाच्या जिवावर हे परदेश दौरे करत आहेत, अशी टीकाही अभिजीत दीपके यांनी केली.





