दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

ट्रिगर-वनमध्ये न आलेल्या तालुक्यांचाही समावेश करणार
मुंबई /1 सप्टेंबर : दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकर्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी, यासाठी पंचनाम्यांची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. प्रत्यक्ष दुष्काळी परिस्थिती असतानाही ‘ट्रिगर-वन’मध्ये न आलेल्या सुमारे 15 ते 18 तालुक्यांचाही अचूक पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे दुष्काळाच्या कक्षेत समावेश करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिली.
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकर्यांना दिवाळीपूर्वी काहीतरी मदत त्यांच्या हातात मिळाली पाहिजे, अशी सरकारची भूमिका असून, कॅबिनेट उपसमितीनेही त्याबाबत शिफारस केली आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि नंदुरबारमधूनही ट्रिगर-वनमध्ये न आलेल्या, मात्र प्रत्यक्ष दुष्काळी स्थिती असलेल्या तालुक्यांचा समावेश करण्याच्या मागण्या आल्या आहेत. त्यासाठी टप्प्याटप्प्याने सर्वेक्षण केले जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.वर हिरवे दिसते, पण खाली काही नाही, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी असल्याने ट्रिगर-वनमध्ये तालुका आला आहे की नाही, यावर दुष्काळाचे मूल्यमापन न करता प्रत्यक्ष स्थितीचा अचूक पंचनामा करणे आवश्यक आहे, असे बावनकुळे म्हणाले. पंचनामा करताना शेतकर्याची सही घेणे महत्त्वाचे असून, त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थितीची नोंद होईल. आणेवारी निश्चित झाल्यानंतर दुष्काळातील मदतीचा लाभ शेतकर्यांना मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले.
पंचनामे प्रत्यक्षात योग्य पद्धतीने होत आहेत की नाहीत, याची तपासणी करण्यासाठी बावनकुळे पुढील तीन दिवसांत सहा जिल्ह्यांना भेट देणार आहेत. संभाजीनगर-जालना, त्यानंतर अकोला-बुलढाणा आणि 4 ऑक्टोबरला धुळे-जळगाव येथे पाहणी केली जाणार आहे. पंचनाम्यासाठी नेमकी टीम क्षेत्रावर आहे का आणि प्रत्यक्ष परिस्थितीची योग्य नोंद होत आहे का, हे तपासणार असल्याचे त्यांनी सांगितले. महसूल, कृषी आणि ग्रामविकास या तीन विभागांकडून पंचनामे केले जात असून त्यावर तिन्ही विभागांच्या अधिकार्यांच्या स्वाक्षर्या असतात. त्यामुळे तीनही विभागांनी समन्वयाने आणि अचूकपणे पंचनामे करणे आवश्यक असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मंत्री पाहणीसाठी येणार असल्याने बांधावर रॅम्प तयार करून शेतकर्यांच्या वरून उडी मारण्याच्या प्रकाराबाबत बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारे शेतकर्यांची थट्टा करणे योग्य नसून संबंधित अधिकार्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दुष्काळाच्या काळात प्रशासनाची यंत्रणा प्रत्यक्ष गावात उपलब्ध असणे आवश्यक आहे.
बँकांनी शेतकर्यांकडे कर्जवसुलीसाठी जाऊ नये – दुष्काळी परिस्थितीत बँकांनी शेतकर्यांकडे कर्जवसुलीसाठी जाऊ नये, असा स्पष्ट इशारा बावनकुळे यांनी दिला. तसे झाल्यास सरकार कठोर कारवाई करेल, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात मुख्य सचिवांना सूचना दिल्या असून, जिल्हाधिकार्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व बँकांच्या अधिकार्यांना बोलावून आवश्यक सूचना द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.





