पत्रकारिता जन माणसाला जागरूक करून राष्ट्रहित साधते
प्रा.मोना चिमोटे यांचे प्रतिपादन

आयआयएमसीत हिंदी पंधरवाडा समारोप
विविध स्पर्धांचे निकाल घोषीत
अमरावती /30 सप्टेंबर : अमरावती येथील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात हिंदी पंधरवडा उत्साहात संपन्न झाला असून स्वातंत्र्य संग्रामात हिंदी पत्रकारितेच्या भूमिकेवर विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात पत्रकारितेची मूल्ये आणि राष्ट्रहित समोर ठेवूनच वृत्तलेखन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. मोमा चिमोटे यांनी केले आहे.स्वातंत्र्यपूर्व काळातील खडतर परिस्थितीतही पत्रकारांनी देशासाठी मोठे योगदान दिले असून राष्ट्रीय चेतना निर्माण करण्याचे काम केले आहे. आजच्या डिजिटल युगात प्रचंड प्रमाणात माहिती उपलब्ध होत असली तरी तिची सत्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे. भाषा ही माणसांना जोडणारा दुवा असल्याने विद्यार्थ्यांनी भाषेवर प्रभुत्व मिळवून वृत्तलेखन करावे, असा मोलाचा सल्ला यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी क्षेत्राचे संचालक डॉ. राजेश सिंह कुशवाह हे होते तर मंचावर डॉ. विनोद निमटकर आणि रोहन तायडे उपस्थित होते.
या पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले असून कविता वाचन स्पर्धेत जयश्री आनंद हिने प्रथम क्रमांक पटकावला तर प्रांजल वरुडकर आणि अक्षता चोर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान मिळवले. पोस्टर निर्मितीत नव्या श्रीवास्तव हिने बाजी मारली असून कृष्ण श्रीवास्तव व श्रद्धा म्हैसकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. निबंध लेखन स्पर्धेत नागेश मघावे, अझक्या कावळे आणि शुभम कुमार यांनी घवघवीत यश संपादन केले असून कर्मचारी गटात अनंत नांदूरकर, भूषण मोहोकार व राजेश झोळकर यांनी पुरस्कार पटकावले आहेत. इंग्रजी पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ’द पब्लिक एंग्लर’ या प्रायोगिक वृत्तपत्राचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विनोद निमटकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रिया हिने केले आणि आभार श्रद्धा म्हैसकर हिने मानले.





