खल्लार येथील बाजार चौकात इसमाची हत्या
दोन विधिसंघर्षित बालकांना घेतले ताब्यात

नदीत फेकलेला घटनेतील चाकू हस्तगत
अमरावती /30 सप्टेंबर- तालुक्यातील खल्लार येथील मुख्य बाजार चौकात दोन विधिसंघर्षित बालकांकडून 42 वर्षीय इसमाची चाकू भोसकून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
नईम शाह तुराब शाह (42, रा. गिट्टी खदान, नागपूर) असे मृत इसमाचे नाव आहे. मृत नईम हा मागील चार महिन्यापासून खल्लार येथील समिना परविन अमिन शाह या महिलेच्या घरी राहत होता. त्या महिलेचा पती अमिन शाह याला मृत नईम मारहाण करीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या दोघांवर रागावून अमिन शहा हा घरून निघून गेला होता.
दरम्यान, बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास 17 व 16 वर्षे वयाच्या दोन विधिसंघर्षित बालकांनी नईमला मुख्य बाजार चौकात गाठून त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. चाकूच्या वाराने तो रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. जागीच त्याचा मृत्यू झाला. खल्लारच्या इतिहासात निर्घृण हत्येची ही पहिलीच घटना आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी खल्लार पोलिसांनी दोन्ही विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. हत्येच्या कारणांचा शोध व पुढील तपास ठाणेदार अमोल मुडे यांच्या मार्गदर्शनात खल्लार पोलिस करीत आहेत.
ज्यावेळी नईमवर चाकूने हल्ला चढविण्यात आला, त्याचवेळी खल्लार पोलिस ठाण्याचे जमादार शेख नूर हे ठाण्याकडे निघाले होते. त्यांनी लगेच दुचाकी थांबवून विधिसंघर्षित बालकांना पकडण्यासाठी पाठलाग केला. तेवढ्यात जमादार अमोल कथलकर हेदेखील आले. त्यांना घटनेबाबत माहिती





