वाठोडाच्या शुक्लेश्वर मंदिरात चोरट्यांनी फोडल्या दोन दानपेट्या

रक्कम लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद

-दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल
वाठोडा शुक्लेश्वर/ 29 जून : वाठोडा शुक्लेश्वर येथील प्रसिद्ध शुक्लेश्वर मंदिरात शनिवारी मध्यरात्री घडलेल्या चोरीच्या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. दोन अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दोन दानपेट्या फोडून त्यातील रक्कम लंपास केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. खोलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
वाठोडा शुक्लेश्वर येथील शुक्लेश्वर मंदिर विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाते. दानपेटीतील नेमकी किती रक्कम चोरट्यांनी चोरुन नेली हे कळू शकले नाही. मात्र येथे सतत शिवभक्तांची वर्दळ राहत असते, त्यामुळे दानपेटीतून मोठी रक्कम चोरट्यांच्या हाती लागली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. मंदिराच्या गाभार्‍यात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. लोखंडी अवजारांच्या सहाय्याने त्यांनी गाभार्‍यातील दोन दानपेट्या फोडल्या आणि त्यातील रक्कम एका पोत्यात भरुन तेथून पळ काढला. ही संपूर्ण घटना गाभार्‍यातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. चोरटे दानपेट्या फोडून पैसे काढताना व पळून जाताना दिसत असले तरी त्यांनी काळ्या कपड्याने आपले चेहरे झाकलेले असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही.
सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली. लोकांनी मंदिरात गर्दी केली होती. देवस्थानचे सचिव सुशांत बेलोकार यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये दोन चोरटे चोरी करताना दिसून आले. सुशांत बेलोकार यांनी याबाबत तात्काळ खोलापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिस लगेच मंदिरात दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. तसेच न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने मंदिरात पोहोचून दानपेटी आणि अन्य वस्तूंवरील ठसेही गोळा केले. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button