दुष्काळावर विशेष अधिवेशन बोलवा !
शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

शेतकर्यांना हेक्टरी 1 लाख देण्याचीही केली मागणी
पत्रातून दुष्काळग्रस्तांसाठी तब्बल 17 मागण्या
मुंबई /27सप्टेंबर : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीने दिलासा मिळावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून दुष्काळग्रस्तांसाठी तब्बल 17 मागण्या करण्यात आल्या आहेत.
शेती आणि शेती व्यवसायासाठी घेतलेल्या सहकारी, राष्ट्रीयीकृत बँका, अर्बन बँका तसेच पतसंस्थांच्या कर्जमाफीची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. तसेच जमीन महसूल आणि कृषी वीजबिल माफ करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त कुटुंबांना प्रतिकुटुंब 25 किलो मोफत धान्य देण्यासोबतच थेट आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकर्यांना प्रतिहेक्टर 1 लाख रुपये, तर शेतमजुरांना 25 हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्नगंभीर होऊ नये, यासाठी तहसीलदारांना टँकर मंजुरीचे अधिकार देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागात रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करावीत आणि जलसंधारणासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, असेही पत्रात म्हटले आहे. दुष्काळाचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत असल्याने शैक्षणिक फी, वसतिगृह फी आणि मेस फी माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर फळबागा आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशीही मागणी शरद पवार यांनी केली आहे. दसरा आणि दिवाळीपूर्वी शेतकरी व शेतमजुरांना मदत मिळावी, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी विनंती शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.





