अमरावतीकरांचा मुंबई प्रवास पुन्हा होणार सोपा

आता आठवड्यातून पाच दिवस विमान उडणार

वेळेत बदल नाही; पण भाडे वाढले

अमरावती/1 सप्टेंबर- बेलोरा विमानतळावरून मुंबईला जाणार्‍या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद पाहून अलायन्स एअर कंपनीने 4 ऑक्टोबरपासून अमरावती-मुंबई विमानसेवा पुन्हा आठवड्यातून पाच दिवस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयामुळे अमरावतीसह संपूर्ण वर्‍हाडातील व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण आणि नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार असून, तिकिटांचे आरक्षणही सुरू झाले आहे.
16 एप्रिल 2025 रोजी बेलोरा विमानतळावरून मुंबईसाठी विमानसेवा सुरू झाली होती. सुरुवातीला आठवड्यातून चार दिवस चालणारी ही सेवा मे 2026 मध्ये पाच दिवस करण्यात आली. परंतु, कंपनीने तांत्रिक कारणांचे निमित्त पुढे करून 25 ऑगस्टपासून ती पुन्हा चार दिवसांवर आणली होती. आता प्रवाशांची गरज लक्षात घेऊन 4 ऑक्टोबरपासून रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या पाच दिवशी विमाने उडणार आहेत. विमानाच्या वेळेत कोणताही बदल केलेला नाही. मुंबईहून भल्या पहाटे 7:05 वाजता उडालेले विमान 8:50 वाजता बेलोराला पोहोचेल, तर अमरावतीहून सकाळी 9:15 वाजता निघून 11:00 वाजता मुंबईला पोहचेल.
सेवा वाढल्याने आनंद असला तरी भाडेवाढीमुळे खिशाला चाट बसत आहे. सुरुवातीला 2,100 रुपये असणारे भाडे आता 3,400 ते 4,000 रुपयांवर गेले असून, गर्दीच्या दिवशी ते आणखी वाढते. तरीही पाच दिवसांच्या सेवेमुळे मुंबई गाठणे सोपे होणार आहे.

विमान प्रवासाचे वेळापत्रक आणि भाडे
अमरावती-मुंबई विमान आता 4 ऑक्टोबरपासून रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार असे पाच दिवस धावेल. मुंबईहून सकाळी 7:05 ला निघून 8:50 ला अमरावती येईल, तर अमरावतीहून 9:15 ला निघून 11:00 ला मुंबईला पोहोचेल. सुरुवातीचे 2,100 रुपयांचे भाडे आता 3,400 ते 4,000 रुपयांपर्यंत वाढले आहे.

Back to top button