केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जीवे मारण्याची धमकी
राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

नवी दिल्ली/1 सप्टेंबर : केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या सुरक्षेसंबंधी चिंता वाढली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोस्टाद्वारे पाठवण्यात आलेल्या पत्रात पासवान यांना धमकी देण्यात आली आहे. या प्रकाराची पासवान यांच्या कार्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. केंद्रीय गृहसचिवांना तात्काळ पत्र लिहून सुरक्षा वाढवण्याची, तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रिपोर्ट्सनुसार, चिराग यांना पाठवण्यात आलेले धमकीचे पत्र इंग्रजीत लिहण्यात आले आहे. कट्टर दहशतवाद्यांकडून लवकरच तुमची हत्या करण्यात येणार आहे, असा मजकूर त्यात आहे. या चिठ्ठीनंतर पासवान यांच्या कार्यालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.





