नगराळा आश्रमशाळेत 30 विद्यार्थ्यांना विषबाधा

डाळ भाजीत पाल पडल्याने खळबळ

विद्यार्थ्यांवर राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

चंद्रपूर /1 सप्टेंबर : जिवती तालुक्यातील नगराळा येथील अंब्रू नाईक माध्यमिक आश्रमशाळेत 29 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांना दिलेल्या दुपारच्या जेवणात पाल पडल्याचा आणि तेच अन्न शिजवून विद्यार्थ्यांना वाढण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. जेवणानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, आश्रम शाळेत नेहमीप्रमाणे दुपारच्या जेवणाची तयारी करण्यात आली. मात्र, अन्न तयार करताना त्यात पाल पडल्याचे सांगण्यात येत आहे. या गंभीर प्रकाराची योग्य ती दखल न घेता तेच अन्न विद्यार्थ्यांना देण्यात आले. भोजन केल्यानंतर काही वेळातच अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडू लागली.
विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि चक्कर येण्यास सुरुवात झाल्यानंतर शाळा प्रशासनाने तातडीने हालचाली करून बाधित विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू करण्यातआले असून, 29 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. सध्या त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.
या घटनेनंतर पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या भोजनाच्या गुणवत्तेची आणि स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अन्नामध्ये पाल पडूनही त्याच अन्नाचा विद्यार्थ्यांना पुरवठा झाला असेल, तर हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी केलेली गंभीर तडजोड असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे. आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या भोजनाची नियमित तपासणी होते का? स्वयंपाकगृहातील स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचे निकष पाळले जातात का? भोजन तयार करताना संबंधित कर्मचार्‍यांकडून आवश्यक दक्षता घेतली जाते का, असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत.

Back to top button