धनुष्यबाण गोठवण्याची मागणी दुर्दैवी

दिल्ली दौर्‍यात एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

जरांगेंनाही दिला ‘सकारात्मक भूमिके’चा सल्ला

सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

नवी दिल्ली/1 सप्टेंबर: राज्यात मंत्रिमंडळ बैठक असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते. अशामध्ये अनेक तर्क-वितर्क लावले गेले. पण, एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीच्या दौर्‍यावर असल्याचे समोर आले. सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुनावणीमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. त्यानंतर, बुधवारी (2 सप्टेंबर) पुन्हा एकदा सुनावणी सुरु होणार असून यावेळी एकनाथ शिंदेंचे वकील शिवसेनेची बाजू मांडणार आहेत. अशामध्ये एकनाथ शिंदेंनी याच कारणासाठी वकिलांशी चर्चा करण्यासाठी दिल्ली दौर्‍यावर आल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.
माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संबंधित वकिलांनी युक्तिवाद करताना काही प्रश्न उपस्थित केले असतील तर ते त्यांचे काम आहे. पण, शेवटी पक्षाची घटना, देशाची घटना, लोकशाही आणि निवडणूक आयोगाचे अधिकार या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत. शिवसेनेच्या वतीने आता या मुद्द्यांवर उत्तर देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत काय भूमिका मांडली जाते, याकडे लक्ष आहे. असे ते म्हणाले. धनुष्यबाण हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्मसन्मानाचा आणि श्रद्धेचा विषय आहे. धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणे दुर्दैवी आहे. ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना गोठवले, 2019 मध्ये हिंदुत्वाला गोठवले. महाराष्ट्राच्या जनतेच्या मताला गोठवले, लोकशाहीला गोठवले आणि शिवसेनेच्या घटनेतही बदल केला. त्यांची भूमिका यावरून स्पष्ट होते, असे म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

Back to top button