अमरावती पोलिसांनी 2 कोटींचा गांजा केला नष्ट
नागपूर येथे इंसीनेटरच्या मदतीने विल्हेवाट

-33 प्रकरणांत जप्त केलेले अंमली पदार्थ
अमरावती / 26 जून: अमरावती पोलिस आयुक्तालयाअंतर्गत विविध पोलिस ठाण्यांमध्ये कारवाई करित 2005 पासून जप्त करण्यात आलेले 2 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ विशेषत: गांजा जाळून नष्ट करण्यात आला. आज, 26 जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. नागपूर येथे इंसिनेटरच्या मदतीने या अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली.
2005 पासून अमरावती पोलिस आयुक्तालयात विविध पोलिस ठाण्यांतर्गत एनडीपीएस अॅक्ट 1985 नुसार दाखल असलेल्या 33 गुन्ह्यांत 1 हजार किलोग्राम अंमली पदार्थ ज्यात प्रामुख्याने गांजाचा समावेश आहे जप्त करण्यात आला होता. त्यात नागपूरी गेट पोलिस स्टेशन अंतर्गत 11, बडनेरा पोलिस स्टेशनअंतर्गत 6, गाडगेनगर पोलिस स्टेशनअंतर्गत 2, खोलापूरी गेट पोलिस स्टेशन अंतर्गत 2, राजापेठ पोलिस स्टेशन अंतर्गत 5, शहर कोतवाली पोलिस स्टेशन अंतर्गत 4 आणि वलगाव पोलिस स्टेशनअंतर्गत 3 प्रकरणांचा समावेश आहे. हे सर्व अंमली पदार्थ आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवसाचे औचित्य साधून नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसार सकाळी अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या केंद्रीय गोडाउनमधून हे अंमली पदार्थ नागपूर बुटीबोरी एमआयडीसीमधील महाराष्ट्र एनवायरो पावर लि. येथे नेण्यात आले. त्याठिकाणी इंसीनेटरच्या मदतीने या पदार्थांची जाळून विल्हेवाट लावण्यात आली.
तत्पूर्वी पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशाने उपायुक्त गणेश शिंदे, कल्पना बारवकर आणि सहाय्यक आयुक्त शिवाजी बचाटे यांची तीन सदस्यीय ड्रग डिस्पोजल कमेटी स्थापन करण्यात आली होती. या कमेटीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई यांच्याकडून हा गांजा नष्ट करण्यासाठी परवानगी प्राप्त केली होती. त्यांनी नागपूर येथे या गांजाची विल्हेवाट लावण्याची परवानगी दिल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ही कार्यवाही पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशाने उपायुक्त गणेश शिंदे, कल्पना बारवकर तसेच सहाय्यक आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक सीमा दाताळकर, सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश इंगळे, उपनिरिक्षक कैलास सानप, हेकॉ अजय मिश्रा, सुधीर गुडधे यांनी केली.




