माझ्या यशात पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचे मोठे योगदान
सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रतिपादन

-महाविद्यालयातर्फे भावपूर्ण सत्कार
अमरावती / 26 जून: श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचे माझ्या यशात मोठे योगदान आहे. महाविद्यालयाला अभिमान वाटेल असे कार्य आपल्या हातून घडावे तसेच देशाची व समाजाची चांगली सेवा या पदावरून करता यावी असा आशावाद व्यक्त सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केला.
डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयचे माजी विद्यार्थी राहीलेल्या न्यायमूर्ती भूषण गवई यांचा आज महाविद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार बळवंत वानखडे, माजी न्यायाधीश विजय आचलिया, प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्यानंतर ज्या महाविद्यालयाने आपल्याला घडविले त्या महाविद्यालयाला भेट देताना आपण भाराउन गेल्याचे ते म्हणाले. आयुष्याच्या जडणघडणी मध्ये अनेकांचा मोठा वाटा आहे. डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाने दिलेली शिकवण माझ्यासाठी महत्त्वाची आहे. महाविद्यालयात मिळवलेल्या मार्गदर्शनामुळेच चांगल्या ठिकाणी पोहोचता आले. हे यश सर्वांचे असल्याचे नमूद करून भविष्यात महाविद्यालयाला अभिमान वाटेल असे कार्य आपल्या हातून घडेल, असे सांगून त्यांनी उपस्थितांकडून आशीर्वाद घेतले व महाविद्यालयाप्रती कृतज्ञभाव व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कार्याचा गौरव केला. संस्थेच्या महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याने देशाच्या न्यायक्षेत्रातील सर्वोच्च पदावर विराजमान होणे हा श्री शिवाजी शिक्षण संस्थेसाठी बहुमान असल्याचे ते म्हणाले. ज्या माध्यमातून त्यांनी हे मोठे यश संपादन केले याची जाणीव ठेवून ते वागतात, ही इतरांसाठी आचरणाची गोष्ट असल्याचे हर्षवर्धन देशमुख म्हणाले. संविधानाचे कार्य भूषण गवई यांच्या माध्यमातून वृद्धिंगत होईल, असा आशावाद देखील हर्षवर्धन देशमुख यांनी व्यक्त केला.
यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गजानन फुंडकर, भैय्यासाहेब उपाख्य जयवंत पाटील (पुसदेकर), कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, कार्यकारी सदस्य हेमंत काळमेघ, प्रा. सुभाष बनसोड, सचिव वि. गो. ठाकरे, स्वीकृत सदस्य प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, प्राचार्य डॉ. अमोल महल्ले, प्रदीप महल्ले, अमर देशमुख, अमरावती बार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील देशमुख, डॉ. अंजली ठाकरे, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख यांनी केले. संचालन डॉ. राधिका देशमुख व आभार प्रदर्शन डॉ. प्राची कडू यांनी केले. श्री शिवाजी शिक्षण संस्था आणि डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सन्मानचिन्ह देवून व भव्य पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला.




