हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेत गोंधळ

पुनर्परिक्षेसाठी अभिजीत दीपके आक्रमक

छत्रपती संभाजीनगरात ठिय्या आंदोलन

छत्रपती संभाजीनगर/16 ऑगस्ट  : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हायकोर्ट लिपिक पदासाठी आज (16 ऑगस्ट) ऑनलाइन परीक्षा पार पडत आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक ठिकाणी या परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाला सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी भेट दिली असून त्यांनी पुनर्परिक्षेची मागणी केली आहे.

हायकोर्टातील लिपीक पदासाठी आयोजित परिक्षेदरम्यान, कल्याण, वाशिम, नांदेड, भंडारा आणि छत्रपती संभाजीनगर या परिक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. ऑनलाईन परिक्षेसाठी वापरण्यात येणार्‍या संगणकाचे कीबोर्ड खराब असल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर केंद्राबाहेर परिक्षेसाठी आलेल्या उमेदवारांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. यानंतर अभिजीत दीपके यांनी उमेदवारांशी संवाद साधला आणि सरकारविरोधात संताप व्यक्त केला.

माध्यमांशी संवाद साधताना अभिजीत दीपके म्हणाले की, आज याठिकाणी हायकोर्टाची परीक्षा होती. त्यामुळे या परिक्षेसाठी खूप लांबून विद्यार्थी आले होते. ते जेव्हा परीक्षेला बसले तेव्हा त्यांना समजले की, इथले कम्प्युटर काम करत नाही, तर कोणाची स्क्रीन काम करत नाही. विशेष म्हणजे 10 मिनिटांच्या आत लॉग आऊट होत होते. याचा अर्थ सर्व्हरही

चांगले काम करत नव्हते. असा सर्व गोंधळ असताना सगळ्याच विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले आहे. पण हे विद्यार्थी फेल नाही झाले, तर ही सिस्टम फेल झाली आहे, सरकार फेल झाले आहे, असा हल्लाबोल दीपके यांनी केला. पुनर्परिक्षेची घोषणा झाल्याशिवाय इथून हलणार नाही

अभिजीत दीपके म्हणाले की, या परिक्षा केंद्रावर जे प्रमुख आहेत, तेच विद्यार्थ्यांना सांगत होते की, तुम्हाला काही कळत नाही. पण परीक्षा कशी घ्यायची, हे तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला अक्कल नाही का? चांगले कम्प्युटर लावायचे, चांगले किबोर्ड लावायचे, सर्व्हर नीट करायचे? या सरकारला स्वत:ला अक्कल नाही आणि ते विद्यार्थ्यांची अक्कल काढत आहेत. त्यामुळे या ठिकाणी आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांची मागणी आहे की, पुनर्परिक्षा झाली पाहिजे आणि लगेच झाली पाहिजे. जोपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयाचे जज बाहेर येऊन लिखितमध्ये पुनर्परिक्षेची गॅरंटी देत नाही, तोपर्यंत इथून कोणीच हलणार नाही, असा इशारा अभिजीत दीपके यांनी यावेळी दिला.

Back to top button