अंबागेट परिसरात तीन दिवस छायाचित्र प्रदर्शन रंगणार

20 ऑगस्टला विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण

छायाचित्र स्पर्धेचे प्रवीण पोटे पाटील करणार उद्घाटन

अमरावती /11 ऑगस्ट– अमरावतीतील कलाप्रेमींसाठी एक आनंदवार्ता असून, रेवणसिद्ध संस्था आणि गेल इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 18 ऑगस्टपासून तीन दिवसीय भव्य राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अंबागेट परिसरातील ऐतिहासिक मृगेंद्र मठ संस्थान येथे रंगणार्‍या या तीन दिवसीय उपक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातील छायाचित्रकारांना आपले कलाकौशल्य दाखवण्याची मोठी संधी मिळणार असून, या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या सोहळ्याचे शानदार उद्घाटन आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी हनुमान आखाड्याच्या सचिवा डॉ. माधुरी चेंडके यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. मंगळवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत आयोजकांनी या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.उद्घाटन सोहळ्याला विरोधी पक्षनेते विलास इंगोले, गेल इंडियाचे माजी संचालक प्रा. रविकांत कोल्हे, नगरसेवक तथा विदर्भ केसरी प्रा. संजय तिरथकर, ड. प्रशांत देशपांडे, शिवराय कुलकर्णी, विवेक कलोती, सुनिता राजू भले, प्रा. संजय शिरभाते, ललिता सुरेश रतावा आणि ज्येष्ठ समाजसेवक नानकराम नेभनानी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता पार पडेल. या वेळी भाजप नेते जयंत डेहनकर, दिनेश सूर्यवंशी, किरण पातूरकर, प्राचार्य दीपक धोटे, प्राचार्य राजेश चंदनपाटोळे आणि ज्येष्ठ छायाचित्रकार श्याम जुनघरे यांची उपस्थिती राहील. स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्वच छायाचित्रकारांचा विलास इंगोले यांच्या वतीने विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी उदय चाकोते, प्रा. रविकांत कोल्हे, कृष्णा डिजिटलचे संचालक सन्नी केचे, मॅक्स मीडियाचे पंकज क्षीरसागर आणि परतवाड्याचे राहुल रामोकर परिश्रम घेत असून त्यांनी सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button