विद्यापीठाचा आशिया खंडात मोठा डंका

जागतिक मानांकनात मारली थेट उत्तुंग भरारी

शिक्षणाचा दर्जा उंचावल्याने मिळाले ऐतिहासिक यश

अमरावती /6 ऑगस्ट: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळीच छाप सोडत ‘क्यूएस आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2026’ मध्ये थेट आशिया खंडात 1001 ते 1100 च्या गटात मानाचे स्थान मिळवले आहे. यासोबतच दक्षिण आशियामध्ये 330 वा क्रमांक पटकावत विद्यापीठाने संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्राची मान उंचावली आहे. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. संदीप वाघुळे यांच्या नियोजनबद्ध उपक्रमांमुळे हे ऐतिहासिक यश मिळाले आहे. या यशाची अधिकृत नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली असून यामुळे विद्यापीठाचा नावलौकिक जगभरात पसरला आहे.
विद्यापीठाच्या या यशामागे गेल्या दोन वर्षांत राबवलेले महत्त्वाचे उपक्रम कारणीभूत ठरले आहेत. प्रत्येक शिक्षकाने वर्षाला किमान तीन दर्जाचे संशोधन निबंध प्रसिद्ध करण्याचे धोरण आखण्यात आले. स्कोपस, डब्लूओएस आणि युजीसीच्या निकषानुसार संशोधनाचे अंतर्गत परीक्षण सुरू झाले. सर्व विभागांमध्ये मूल्यवर्धित अभ्यासक्रमांची संख्या वाढवण्यात आली. एपीआय प्रमाणपत्र आणि कॅस प्रक्रियेला गती देऊन परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर करण्यात आले. याशिवाय ’स्कूल कनेक्ट’ उपक्रम, माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आणि उद्योगांसोबत झालेले महत्त्वाचे करार यामुळे शैक्षणिक वातावरणात मोठा बदल झाला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधील संशोधन, पेटंट्सची संख्या, विद्यार्थ्यांचे थेट नोकरीतील प्रवेश आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत कमालीची सुधारणा दिसून येत आहे

Back to top button