सरन्यायाधीश भूषण गवई आज अमरावतीत
वकिल संघातर्फे सत्कार

अमरावती /24 जून: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई उद्या बुधवार, 25 जून रोजी अमरावतीच्या दौर्यावर येत आहेत. मुळ अमरावतीकर असलेले न्यायमूर्ती भूषण गवई यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल अमरावती वकिल संघातर्फे आज त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यात सहभागी होण्यासाठी न्यायमूर्ती भूषण गवई अमरावतीला येत आहेत.
दुपारी न्या. गवई यांचे दिल्ली येथून अमरावतीला आगमन होईल. सायंकाळी 6 वाजता कठोरा रोडवरील पी.आर. पोटे इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्वामी विवेकानंद सभागृहात अमरावती जिल्हा वकील संघामार्फत आयोजित सत्कार सोहळ्याला ते उपस्थित राहतील. त्यानंतर रात्री त्यांची वेळ राखीव राहणार आहे. गुरूवार, 26 जून रोजी सोयीनुसार भूषण गवई अमरावतीहून छत्रपती संभाजी नगरकडे प्रयाण करतील.




