दुकानफोडीतील आरोपीला काही तासांत अटक

परतवाडा पोलीसांची धडक कारवाई

अचलपुर / 24 जून: परतवाडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत किराणा दुकानफोडीचा गुन्ह्याचा छडा लावत चोरट्यास अटक करण्यात यश प्राप्त केले आहे. फिर्यादी पियुष संतोष अग्रवाल (वय 29, रा. नाईक प्लॉट, कांडली, परतवाडा) यांच्या मालकीच्या हरिओम किराणा दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील गल्ल्यातील 17,050 रुपये चोरून नेले होते. 23 जून च्या रात्री घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासासाठी डी.बी. पथकाला विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. तपासादरम्यान गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार पोलीस रेकॉर्डवरील संशयित आरोपी शेख सलीम उर्फ नायटा (वय 33, रा. मुगलाईपुरा, परतवाडा) बैतूल स्टॉप परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीतून चोरीला गेलेले 17,050 रुपये रोख रक्कम व एमएच 28 ए 5758 क्रमांकाची मोटरसायकल (किंमत अंदाजे 30,000 रुपये) असा एकूण 47,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज बडे, पीएसआय खांडेकर, हाके आणि डी. बी. पथकातील कर्मचारी पो.हे.कॉ. सचिन होले, सुधीर राऊत, विवेक ठाकरे, घनश्याम किरोले, शुभम शर्मा, जितेश बाबील, योगेश बोदुळे आणि सचिन कोकणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button