महिलेच्या गळ्यातील 13 ग्रामची सोन्याची चेन हिसकली

अभियांत्रिकीनजीकची घटना

अमरावती / 24 जून: मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची 13 ग्राम वजनाची चेन मोटरसायकलवरुन आलेल्या एका भामट्याने हिसकून पळ काढल्याची घटना व्हीएमव्ही मार्गावर शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर आज सकाळी घडली.
प्राप्त माहितीनुसार सदर महिला या आशियाड चौकातील वरद अपार्टमेंटमधील रहिवासी आहेत. नेहमीप्रमाणे आज सकाळी त्या व्हीएमव्ही मार्गावर वॉकसाठी निघाल्या होत्या. यावेळी त्यांनी गळ्यात 13 ग्रामची सोन्याची चेन परिधान केली होती. शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयानजीक त्या पोहोचल्या तेव्हा एक युवक मोपेडवरुन समोरून त्यांच्याजवळ येउन थांबला. महिलेला काही कळायच्या आत त्याने महिलेच्या गळ्यावर झडप मारली आणि गळ्यातील सोन्याची साखळी ओधून घेतली. त्यानंतर लगेच युवकाने घटनास्थळाहून पळ काढला.
या घटनेमुळे महिला भांबावून गेल्या होत्या. नंतर त्यांनी स्वत:ला सावरुन कुटुंबियांच्या मदतीने गाडगेनगर पोलिस ठाणे गाठले व याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. मागील काही महिन्यात पोलिसांनी चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये अनेक आरोपींना अटक करण्यात यश प्राप्त केले आहे. मात्र त्यानंतरही अशाप्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार शहरात सक्रिय असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button