मावशीकडे राहणार्‍या बालिकेवर बळजबरीचा प्रयत्न

मावशीने पिडितेलाच धमकावले

-शिक्षकाच्या मदतीने तक्रार दाखल
-दोघांवर नोंदविला गुन्हा
अमरावती/ 24 जून: शिक्षणाच्या निमित्ताने आपल्या मावशीकडे राहणार्‍या एका 10 वीची विद्यार्थीनी असलेल्या अल्पवयीन बालिकेवर घरातील 45 वर्षीय पुरुषाने झोपेत असताना बळजबरीचा प्रयत्न केला. हा प्रकार मावशीला सांगितल्यानंतर तिनेही मुलीला धमकावून वाच्यता न करण्याची तंबी दिली. अखेर आपल्या शिकवणी वर्गाच्या शिक्षकाला मुलीने आपबिती सांगितली. त्यांच्या मदतीने तिने चाईल्ड हेल्पलाईनच्या माध्यमातून राजापेठ पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंदविला आहे.
14 वर्षीय पिडितेने याबाबत राजापेठ पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार ती अमरावती शहरातील एका शाळेत दहावीची विद्यार्थीनी आहे. आई-वडिलांचे आपसात पटत नसल्याने तिची आई वडिलांपासून विभक्त झाली असून तिने दुसरा विवाह केला आहे. पिडिता आपले वडिल आणि आजी-आजोबांसोबत राहते. दरम्यान गेल्या एक महिन्यांपासून ही बालिका राजापेठ परिसरातील रहिवासी असलेल्या आपल्या मावशीकडे राहायला गेली होती. मावशीसोबत काम करणारा एक 45 वर्षीय व्यक्तीही तेथे वास्तव्यास होता.
या नराधमाची 14 वर्षिय बालिकेवर पडली. त्याने बालिकेसोबत अश्लिल चाळे करायला सुरुवात केली. मावशी घरी नसताना त्याने बालिकेसोबत आक्षेपार्ह वर्तन केले. पिडितेने याबाबत मावशीला सांगितले असता तिने त्याकडे दुर्लक्ष केले. आरोपीचे बालिकेसोबतच चाळे सुरुच होते. त्यामुळे बालिकेने मावशीला आपल्याला वडिलांकडे सोडून देण्यास सांगितले. तेव्हा तिचे न ऐकता मावशीने पिडितेलाच तेथेच राहण्याची आणि वाच्यता केल्यास हात-पाय तोडण्याची धमकी दिली. दरम्यान रात्री पिडिता मावशीजवळ झोपली असताना आरोपीने तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. जाग आल्याने पिडितेने आरडाओरड केली. त्यावेळीही आरोपी आणि तिच्या मावशीने पिडितेलाच जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकारामुळे घाबरलेल्या पिडित मुलीने आपबिती आपल्या शिकवणी वर्गाच्या शिक्षकांना सांगितली. बाब गंभीर असल्याने शिक्षकांनी याबाबत चाईल्ड हेप्पलाईनची मदत घेतली. हेल्पलाईनच्या माध्यमातून पिडितेची राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्याआधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा नोंदविला आहे. पिडित बालिकेला सध्या गर्ल्स हायस्कुल चौकातील दयासागर बालविकास संस्थेच्या सदाशांती बालगृहात ठेवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button